प्रवीण गायकवाड यांच्या वरील हल्ल्यामागचे खरे काटेरी सूत्रधार ओळखा – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

प्रवीण गायकवाड यांच्या वरील हल्ल्यामागचे खरे काटेरी सूत्रधार ओळखा – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

प्रवीण गायकवाड यांच्या वरील हल्ल्यामागचे खरे काटेरी सूत्रधार ओळखा – माजी मंत्री बाळासाहेब थोरात
संगमनेर । प्रतिनिधी । संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ संगमनेर मध्ये विविध पुरोगामी संघटना, विद्यार्थी संघटना, राजकीय पक्ष व शहरातील सर्वपक्षीय नागरिकांनी एकत्र येऊन तीव्र निषेध केला असून हा भ्याड हल्ला करणारा काटे हा मुखवटा असून त्या मागील खरे सूत्रधार ओळखा असे आवाहन करताना गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

संगमनेर बस स्थानक येथे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ छात्र भारती, राष्ट्रसेवा दल, अंधश्रद्धा निर्मूलन समिती बहुजन विकास मंच, गाथा परिवार या विविध पुरोगामी संघटनांसह काँग्रेस, शिवसेना, रिपाई, यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मा.आ. डॉ. सुधीर तांबे, सौ दुर्गाताई तांबे, डॉ जयश्रीताई थोरात, प्रा.हिरालाल पगडाल, शिवसेनेचे अमर कतारी,अनिकेत घुले ॲड. समीर लामखडे, राम अरगडे, सोमेश्वर दिवटे ,अजय फटांगरे, सौ अर्चना बालोडे, किरण रोहम, राजा आवसक, जावेद शेख, सुरेश झावरे यांच्यासह विविध पक्षांचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

संगमनेर बस स्थानक ते प्रांताधिकारी कार्यालय असा भव्य मोर्चा यावेळी काढण्यात आला या मोर्चामध्ये छात्र भारती व राष्ट्रसेवा दलाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

याप्रसंगी बोलताना मा मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ला हा अत्यंत भ्याड व निंदनीय आहे. त्यांचा विचार हा सर्वांना पुढे घेऊन जाणार आहे. मराठा शब्द हा महाराष्ट्रातील सर्वांसाठी आहे. छत्रपती शिवाजी महाराज ,छत्रपती संभाजी महाराज, फुले, शाहू आंबेडकरांचा समतेचा विचार ते सांगत होते. मात्र जातीय तेढ निर्माण करणाऱ्या पक्षांनी गायकवाड यांच्यावर हल्ला करून दहशत निर्माण करण्याचा केलेला हा प्रयत्न आहे. भाजप व आरएसएस चा शिवधर्म खरा नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अवेहलना झाली. त्यावेळी त्यांचे लोक एक शब्द सुद्धा बोलले नाही. महाराजांबद्दल भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी अपशब्द वापरले . त्यावेळेस सत्ताधारी बोलले नाही. त्यांनी जातीय राजकारणासाठी वेगवेगळी व्यासपीठ निर्माण केली आहे . त्यामधून ती जातीय विष पेरत आहेत. राज्यात गुंडांना हाताशी धरून दहशत निर्माण केली जात आहे.

पुरोगामी विचार सांगणारे दाभोळकर, पानसरे यांची हत्या करणाऱ्यांचा शोध लागत नाही .बीडमध्ये संतोष देशमुख प्रकरण परभणीतील सोनवणे यांचा मृत्यू हे सर्व घडत असताना विधानसभेच्या परिसरामध्ये मारामारी होते की अत्यंत निंदनीय आहे. 40 वर्षांमध्ये असे कधी चित्र नव्हते. कॅन्टीनमध्ये आमदार मारहाण करतो आणि आमदारांवर कोणतीही कारवाई न होता कॅन्टीन वाल्यावर कारवाई होते हा काय प्रकार आहे.प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ले करणाऱ्यांवर अदखलपात्र गुन्हे दाखल झाले आहे. त्याचा काय उपयोग होणार आहे. गुन्हेगार कोणीही असो कठोर शिक्षा झाली पाहिजे. नाहीतर उद्या हे लोक जामीनवर सुटतील आणि पुन्हा भाजपचे पुढारी म्हणून मिरवतील. हा प्रकार महाराष्ट्रात सुरू असून महाराष्ट्रात वाढलेली दहशत ढासळलेली कायदा व्यवस्था, आणि जे सरकार गोरगरिबांचे रक्षण करू शकत नाही अशा या सरकारला सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार नाही अशी टीकाही वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी महायुती सरकारवर केली आहे .तर मा आ.डॉ तांबे म्हणाले की, धर्माच्या नावावर राजकारण भाजप सध्या करत असून गुंड लोकांना हाताशी धरून पुरोगामी विचार आणि लोकशाही संपवण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे. युवकांनी एकत्र येऊन अशा देश विघातक शक्तींना थांबवण्यासाठी विचारांची जोरदार लढाई करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले तर डॉ जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, भाजपने जन सुरक्षा कायदा हा भाजप रक्षा कायदा केला आहे . यामुळे सर्वसामान्य जनतेला आंदोलनाचा अधिकार आता राहणार संतांचा व समतेचा पुरोगामी विचार सांगणाऱ्या प्रवीण दादा गायकवाड यांच्यावरील हल्ला हा महाराष्ट्रातील पुरोगामी विचारांवर झालेला हल्ला असून महाराष्ट्राचा बिहार होतो की काय अशी परिस्थिती राज्यात निर्माण झाली असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. तर अनिकेत घुले म्हणाले की हल्ले करणारे हे भिडे गुरुजी समर्थक आहेत तर आपण साने गुरुजी समर्थक आहोत.

यावेळी शिवसेनेचे अमर कतारी,प्रा हिरालाल पगडाल, प्रा उल्हास पाटील, अजय फटांगरे, दत्ता ढगे, किरण रोहम यांच्यासह अनेक पदाधिकारी व युवकांनी सरकारच्या धोरणांवर टीका करताना प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला. यावेळी राहुल जराड, गणेश जोंधळे, विशाल शिंदे, मोहम्मद तांबोळी ,गाथा भगत ,मशिरा तांबोळी, सुमित खरात, अनिकेत खरात, अभिषेक वैराळ, सचिन आहेर, वैष्णव मुर्तडक यांच्यासह युवक काँग्रेसचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे निवेदन प्रांताधिकारी अरुण उंडे यांनी स्वीकारले यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे उपस्थित होते.
सरकारकडून उत्तर कोरियाप्रमाणे मीडीयाची मुस्कटदाबी
उत्तर कोरिया मध्ये हुकूमशाही सुरू आहे .तेथे एकच न्यूज चैनल आणि एकच वृत्तपत्र आहे .सरकार सांगेल तेच ऐकले जात आहे. वृत्तपत्रांचे स्वातंत्र्य काढून घेतले आहे. तीच परिस्थिती भारतामध्ये सुद्धा सुरू आहे. माध्यमांवर अनेक निर्बंध आहेत. त्यांना व्यक्त होता येत नाही. विरोधकांचा आवाज दाबला जात आहे. माध्यमांनी जर वेळीच योग्य भूमिका घेतली नाही तर भारतामध्येही उत्तर कोरिया सारखी परिस्थिती निर्माण होईल अशी भीतीही काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे.