ब्रेकिंग

धरणांमधून पाणी सोडताना प्रशासनाशी समन्वय राखावा – जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे

राज्यातील पूरपरिस्थिती, धरणांतील पाणीसाठ्याचा आढावा

धरणांमधून पाणी सोडताना प्रशासनाशी समन्वय राखावा – जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे

जाहिरात मो-7756055359

राज्यातील पूरपरिस्थिती, धरणांतील पाणीसाठ्याचा आढावा

लोणी । प्रतिनिधी । मागील दोन दिवसांपासून कृष्णा व गोदावरी लाभक्षेत्रात झालेला पाऊस, धरणांमधील पाणीसाठा, संभाव्य पूरस्थिती व आषाढी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जलव्यवस्थापनाचे प्रभावी नियोजन करावे. संभाव्य परिस्थितीचा सातत्याने आढावा घेऊन विभागातील सर्व अधिकाऱ्यांनी सतर्क राहावे. धरणांमधून पाणी सोडताना जिल्हा प्रशासन, महसूल विभाग व पोलीस प्रशासनाशी आवश्यक समन्वय राखावा. प्रत्येक धरणाचा आपत्कालीन कृती आराखडा अद्ययावत ठेवून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे यांनी दिले.

जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे यांनी आज मुंबई येथून दूरदृश्यप्रणालीद्वारे कृष्णा व गोदावरी लाभक्षेत्रातील पावसाची स्थिती व धरणांमधील पाणीसाठ्याचा आढावा घेतला. या बैठकीस पुणे व नाशिक विभागातील जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी, दोन्ही महामंडळांचे कार्यकारी संचालक, मुख्य अभियंते, अधीक्षक अभियंते व क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते. बैठकीत राज्यातील अतिवृष्टीची सद्यस्थिती, पूरपरिस्थिती, धरणांमधील जलसाठा, प्रमुख नदीखोऱ्यांतील पाण्याची आवक, बदलत्या नैसर्गिक परिस्थितीनुसार धरणांचे व्यवस्थापन तसेच आषाढी पालखी सोहळ्यासाठी करण्यात आलेल्या पाण्याच्या नियोजनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे कृष्णा व गोदावरी खोऱ्यांत मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून दोन्ही विभागांतील धरणांमधील जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे, अशी माहिती दोन्ही महामंडळांच्या कार्यकारी संचालकांनी दिली. पुणे विभागातील मोठ्या धरणांमधील उपयुक्त पाणीसाठा जुलैच्या पहिल्या आठवड्यात केवळ १२ टक्के होता. तो ७ जुलैपर्यंत ३१ टक्क्यांवर पोहोचला असून अवघ्या पाच दिवसांत सुमारे ८०.८ टीएमसी पाण्याची वाढ झाली आहे. खडकवासला धरण समूहात ७.५४ टीएमसी, पवना धरणात ४.८४ टीएमसी, भामा आसखेड धरणात ४.१५ टीएमसी, वीर धरण समूहातील भाटघर धरणात ५.१६ टीएमसी, वीर धरणात २.०१ टीएमसी व नीरा देवघर धरणात २.६२ टीएमसी पाण्याची आवक झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.नाशिक विभागातील मोठ्या धरणांमधील उपयुक्त पाणीसाठा २६ टक्क्यांवरून २९ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. भंडारदरा धरणात ४.७५ टीएमसी, निळवंडे धरणात १.७१ टीएमसी, दारणा धरणात १.५५ टीएमसी व गंगापूर धरणात २.१२ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर विभागातील मोठ्या धरणांमधील उपयुक्त पाणीसाठा ३० टक्क्यांवरून ३१ टक्क्यांपर्यंत वाढला असून जायकवाडी धरणातील उपयुक्त जलसाठा सुमारे २१.७६ टीएमसीपर्यंत पोहोचल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.अतिवृष्टी व संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्य अभियंते, अधीक्षक अभियंते व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी धरणांचे सुरक्षित, वैज्ञानिक पद्धतीने व्यवस्थापन करावे. भारतीय हवामान विभाग, केंद्रीय जल आयोग व हवामान पूर्वानुमान प्रणालीकडून प्राप्त होणाऱ्या अंदाजांचा सातत्याने आढावा घ्यावा. धरणांमध्ये होणारी पाण्याची आवक, जलसाठा, पाणी सोडण्याचे नियोजन व नदीपात्रातील प्रवाह यांचे सातत्याने विश्लेषण करून त्यानुसार वेळीच निर्णय घ्यावेत. धरणांमधून पाणी सोडताना जिल्हा प्रशासन, महसूल विभाग, पोलीस प्रशासन तसेच राज्य व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांशी सातत्याने संपर्क ठेवावा, अशा सूचना जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.बैठकीत आगामी आषाढी पालखी सोहळ्याच्या मार्गावरील नदीपात्र, कालवे व मुक्कामस्थळांवर आवश्यकतेनुसार पाणी उपलब्ध राहील, यासाठी योग्य नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. वारकरी व स्थानिक नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवून पालखी सोहळा सुरक्षित व सुरळीत पार पडण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असेही डॉ. विखे यांनी सांगितले.मान्सून कालावधीत धरणांची संरचनात्मक सुरक्षितता, यांत्रिक उपकरणे व विद्युत प्रणाली यांची नियमित तपासणी करावी. धरणांवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सतर्कता राखून परिस्थितीतील प्रत्येक बदलाकडे बारकाईने लक्ष द्यावे. नदीकाठच्या नागरिकांना अचूक, पारदर्शक व अधिकृत माहिती वेळेवर उपलब्ध करून देण्यासाठी सामाजिक माध्यमांचा प्रभावी वापर करावा, असे निर्देश जलसंपदामंत्री श्री.विखे पाटील यांनी दिले

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!