
धांदरफळ खुर्द सबस्टेशन वर शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा

विजेचा प्रश्न सुटत नसल्याने शेतकरी आक्रमक
संगमनेर । प्रतिनिधी । संगमनेर तालुक्यात अनेक गावांमध्ये मागील अनेक दिवसांपासून विजेचा पुरवठा सुरळीत सुरू नाही. याबाबत सातत्याने निवेदन देऊनही वीज विभाग कोणत्याही प्रकारची कार्यवाही करत नाही. त्यामुळे धांदरफळ खुर्द सबस्टेशनवर शेतकऱ्यांनी आज आक्रोश मोर्चा काढला.

धांदरफळ खुर्द सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या धांदरफळ पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने एकत्रित वीजपुरवठ्याच्या विविध समस्यांबाबत वीज अधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी उपकार्यकारी अभियंता रमेश घुगे ज्युनिअर इंजिनिअर पवार तसेच सातभाई साहेब यांच्या समोर शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी सांगितल्या. व या मागण्या आठ दिवसात सुटल्या नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी यावेळी निवेदनातून दिला आहे शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या शेतीसाठी तीन फेज वीज पुरवठ्याची वेळ रात्री 9. 45 ते पहाटे 5.45 अशी आहे. संपूर्ण अंधारात शेतकऱ्यांना शेतीला पाणी देण्यासाठी जावे लागत आहे परिसरात वन्य प्राण्यांची भीती असताना रात्रीच्या वेळी शेतीला पाणी देणे अत्यंत धोकादायक आहे. दररोज संध्याकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत लोड शेडिंग केले जाते. ते लोड शेडिंग ग्रामीण भागातच करण्यात येत आहे. अशा या महावितरणच्या चुकीच्या नियोजनामुळे शेतकऱ्यांना मोठी अडचण होत आहे. या समस्या पुढील आठ दिवसात सुटल्या नाही तर तीव्र स्वरूपात आंदोलन छेडले जाईल असा इशाराही यावेळी आंदोलकांनी दिला. यावर उपकार्यकारी अभियंता रमेश घुगे यांनी 8 दिवसाच्या आत सर्व समस्या सोडवण्याचे आश्वासन उपस्थितांना दिले.यावेळी धांदरफळ खुर्द, धांदरफळ बु, निमगाव ,निमगाव बुद्रुक ,पेमगिरी , नांदुरी, सांगवी, कवठे, निमज या गावातील शेतकरी युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोड शेडिंग बंद करणे बाबत काँग्रेसचा सातत्याने पाठपुरावा
तालुक्यात सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत अनेक ठिकाणी लोड शेडिंग होत असते त्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास शेतकऱ्यांना शेतीची कामे, गोठ्यातील कामे सर्व याच वेळेत करावयाचे असतात त्यामुळे या वेळेमध्ये लोड शेळी करू नये याकरता डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले होते. शेतकऱ्यांना सुरळीत व पूर्ण दाबाने वीज पुरवठा करावा ही मागणी सातत्याने केली जात आहे



