कत्तलीसाठी डांबलेल्या 14 गोवंशीय जनावरांची सुटका; संगमनेरात LCBची धडक कारवाई

कत्तलीसाठी डांबलेल्या 14 गोवंशीय जनावरांची सुटका; संगमनेरात LCBची धडक कारवाई

1 लाखांचा मुद्देमाल जप्त; पाच आरोपी फरार
संगमनेर । प्रतिनिधी । संगमनेर तालुक्यात कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवलेल्या 14 गोवंशीय जनावरांची स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुटका केली. या कारवाईत पोलिसांनी सुमारे 1 लाख रुपये किमतीची 14 लहान-मोठी गोवंशीय जनावरे ताब्यात घेतली. ही कारवाई 11 सप्टेंबर रोजी कुरण गावच्या शिवारात करण्यात आली.

अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध व्यवसायांची माहिती घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले आहेत. त्यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार विजय पवार, रिचर्ड गायकवाड, राहुल डोके, भगवान थोरात, सुनील मालणकर आणि महादेव भांड यांचे पथक तयार केले होते.दरम्यान, 11 सप्टेंबर रोजी हे पथक संगमनेर शहर पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यांची माहिती घेत असताना, कुरण गावातील जमील शेख यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये व मोकळ्या जागेत गोवंशीय जनावरे कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवण्यात आल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली.

माहितीची खात्री करण्यासाठी पोलीस पथकाने पंचांसमक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यावेळी शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये तसेच मोकळ्या जागेत गोवंशीय जनावरे डांबून ठेवलेली आढळून आली. घटनास्थळाच्या परिसरातील नागरिकांकडे चौकशी केली असता सदर जनावरे जमील उर्फ जमालुद्दीन शेख, अशपाक राजू शेख, तनवीर मुन्ना पठाण, आदिल शेख व सलमान शेख, सर्व रा. कुरण, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर यांच्या मालकीची असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी संबंधितांचा शोध घेतला असता ते घटनास्थळी मिळून आले नाहीत.
यानंतर पथकाने पंचांसमक्ष घटनास्थळावरून 1 लाख रुपये किमतीची 14 लहान-मोठी गोवंशीय जनावरे ताब्यात घेऊन त्यांची सुटका केली.याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 859/2026 नुसार महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम 1995 सुधारित 2015 मधील कलम 5(अ), 5(ब), 5(क), 9 तसेच प्राण्यांना निर्दयतेने वागविण्याबाबतच्या कलम 3 व 11 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास संगमनेर शहर पोलीस ठाणे करीत आहे. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव तसेच पोलीस अंमलदार विजय पवार, रिचर्ड गायकवाड, राहुल डोके, भगवान थोरात, सुनील मालणकर आणि महादेव भांड यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कारवाई केली.



