ब्रेकिंग
दिवाळी हाट’मुळे महिला उद्योजिकांच्या व्यवसायाला भरारी; तीन दिवसांत झाली लाखोंची उलाढाल

दिवाळी हाट’मुळे महिला उद्योजिकांच्या व्यवसायाला भरारी; तीन दिवसांत झाली लाखोंची उलाढाल


दिवाळी हाट’मुळे महिला उद्योजिकांच्या व्यवसायाला भरारी; तीन दिवसांत झाली लाखोंची उलाढाल
कोपरगांव । प्रतिनिधी । दिवाळीच्या खरेदीच्या निमित्ताने महिला बचत गट, गृहउद्योग करणाऱ्या महिला आणि स्थानिक व्यावसायिकांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देणाऱ्या प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या ‘दिवाळी हाट’ खरेदी महोत्सवाला कोपरगावकरांनी भरघोस प्रतिसाद दिला. तीन दिवसांत लाखोंची उलाढाल झाल्याने महिला उद्योजिकांना आर्थिक उत्पन्नाची संधी मिळाली, तर स्थानिक बाजारपेठेलाही चालना मिळाली. माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या ‘दिवाळी हाट’ खरेदी महोत्सवात कोपरगाव तालुक्यासह ग्रामीण व शहरी भागातील महिलांनी सहभाग नोंदवत आपली उत्पादने विक्रीसाठी आणली होती. घरगुती वस्तू, दिवाळीचे फराळाचे पदार्थ आणि विविध उत्पादनांची विक्री येथे करण्यात आली. दर्जेदार, स्वदेशी आणि रास्त दरातील वस्तू एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने नागरिकांना खरेदीची चांगली संधी मिळाली.

गौतम सहकारी बँकेच्या माजी संचालिका तथा प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे म्हणाल्या की, “दिवाळी हाट हा महिला बचत गट आणि महिला उद्योजिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळवून देणारा उपक्रम आहे. अनेक महिला घरगुती उत्पादनांच्या माध्यमातून स्वतःचा व्यवसाय उभा करत आहेत. त्यांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाल्यामुळे विक्री वाढण्यासोबतच व्यवसायाचा विस्तार करण्याची संधी मिळत आहे. दिवाळी हाटच्या माध्यमातून नागरिकांनी स्थानिक महिला व्यावसायिकांच्या उत्पादनांची खरेदी केल्यास त्यांच्या आर्थिक स्वावलंबनाला बळ मिळते. तसेच, स्थानिक पातळीवर होणाऱ्या आर्थिक उलाढालीतून छोट्या व्यावसायिकांना प्रोत्साहन मिळते आणि तालुक्याच्या अर्थकारणाला चालना मिळते. महिलांच्या कौशल्याला संधी, त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ आणि त्यांच्या कुटुंबांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्याचा ‘दिवाळी हाट’चा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

‘दिवाळी हाट’मुळे तीन दिवसांत वर्षभराच्या नफ्याइतके उत्पन्न मिळण्याची संधी; आमच्या व्यवसायाला हक्काची बाजारपेठ मिळाली अशा शब्दात महिला विक्रेत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.आमच्यासारख्या छोट्या व्यावसायिक महिलांसाठी ‘दिवाळी हाट’ म्हणजे केवळ स्टॉल लावण्याची संधी नसून व्यवसायाला नवी दिशा देणारे हक्काचे व्यासपीठ आहे. वर्षभर मेहनत करून जेवढा नफा मिळतो, तेवढा नफा या तीन दिवसांत मिळत असल्याचा अनुभव काही महिलांनी व्यक्त केला. ग्राहकांपर्यंत थेट पोहोचता येते, उत्पादनांची ओळख निर्माण होते आणि पुढील काळातही खरेदी करणारे ग्राहक जोडले जातात. कोणताही मार्केटिंग खर्च न करता एवढ्या मोठ्या बाजारपेठेत आपली उत्पादने विकण्याची संधी मिळणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. महिला बचत गट आणि छोट्या व्यावसायिक महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी अशी संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे आणि सौ.चैतालीताई काळे यांचे आभार मानले.



