कोपरगावकरांच्या प्रतिसादाने ‘दिवाळी हाट’मध्ये विक्रेत्यांच्या चेहऱ्यावर समाधान

कोपरगावकरांच्या प्रतिसादाने ‘दिवाळी हाट’मध्ये विक्रेत्यांच्या चेहऱ्यावर समाधान


कोपरगावकरांच्या प्रतिसादाने ‘दिवाळी हाट’मध्ये विक्रेत्यांच्या चेहऱ्यावर समाधान
कोपरगांव । प्रतिनिधी । दिवाळीच्या सणानिमित्त नागरिकांना आवश्यक वस्तूंची खरेदी एकाच ठिकाणी करता यावी, तसेच स्थानिक छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने कोपरगाव येथील कृष्णाई मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ‘दिवाळी हाट’ला कोपरगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विविध वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावल्याने ‘दिवाळी हाट’ मध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्राहकांच्या वाढत्या प्रतिसादामुळे विक्रेत्यांची मोठ्या प्रमाणात विक्री होत असून, त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसून येत आहे.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आकर्षक वस्तू, सजावटीचे साहित्य, आकाशकंदील, पणत्या, फराळाचे पदार्थ, कपडे तसेच विविध दैनंदिन गरजेच्या वस्तूंनी ‘दिवाळी हाट’ सजला आहे. एकाच ठिकाणी विविध वस्तू खरेदी करण्याची सुविधा मिळत असल्याने नागरिकांकडून या उपक्रमाला पसंती दिली जात आहे. स्थानिक व्यावसायिकांना आपल्या वस्तू थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याची संधी मिळाल्याने त्यांच्या व्यवसायालाही चालना मिळत आहे. ‘दिवाळी हाट’ला नागरिकांनी आवर्जून भेट देत स्थानिक व्यावसायिक आणि महिला बचत गटांच्या उत्पादनांची खरेदी करून त्यांना प्रोत्साहन दिले, ही आनंदाची बाब आहे. या उपक्रमामुळे स्थानिक व्यावसायिकांना विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले असून महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळण्यास मदत होत आहे.

नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे विविध वस्तूंची मोठ्या प्रमाणात विक्री होत असून विक्रेत्यांच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान व सर्व वस्तू माफक दरात मिळत असल्याने ग्राहकाच्या चेहऱ्यावरचा आनंद हे या ‘दिवाळी हाट’चे यश आहे. स्थानिक व्यावसायिक आणि महिलांच्या कष्टातून तयार झालेल्या उत्पादनांना प्राधान्य दिल्यास त्यांच्या आर्थिक उन्नतीला हातभार लागेल. दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासोबतच स्थानिक व्यवसायाला चालना देणाऱ्या या उपक्रमाला नागरिकांनी दिलेला प्रतिसाद निश्चितच प्रोत्साहन देणारा आहे. भविष्यातही नागरिकांनी स्थानिक उत्पादनांच्या खरेदीला प्राधान्य देऊन व्यावसायिक आणि महिला बचत गटांना सहकार्य करावे अशी अपेक्षा प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा तथा गौतम सहकारी बँकेच्या माजी संचालिका सौ. पुष्पाताई काळे यांनी केले आहे.



