ब्रेकिंग

कवी अनंत फंदी नाट्यगृहाची तिसरी घंटा लवकरच वाजणार!

कवी अनंत फंदी नाट्यगृहाची तिसरी घंटा लवकरच वाजणार!

आमदार सत्यजित तांबे यांच्याकडून अंतिम टप्प्यातील कामाची पाहणी; लवकरच नाट्यगृह रसिकांच्या सेवेत
संगमनेर । प्रतिनिधी । संगमनेरच्या समृद्ध साहित्यिक, सांस्कृतिक आणि नाट्यपरंपरेला आधुनिकतेची जोड देणारे, कवी अनंत फंदी यांच्या नावाने उभारण्यात येत असलेले एक हजार आसनक्षमतेचे अद्ययावत बंदिस्त नाट्यगृह लवकरच प्रेक्षकांच्या सेवेत दाखल होणार आहे. या नाट्यगृहाच्या अंतिम टप्प्यातील कामाची आमदार सत्यजित तांबे यांनी पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. नाट्यगृहाचे काम पूर्णत्वाकडे जात असल्याने संगमनेरमधील नाट्यप्रेमी आणि कलारसिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सौ. दुर्गाताई तांबे यांच्या नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात कवी अनंत फंदी खुले नाट्यगृह बंदिस्त करण्याच्या कामाला सुरुवात झाली. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी आमदार सत्यजित तांबे यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून, आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठीही पुढाकार घेतला आहे. त्यातूनच हे नाट्यगृह आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. या पाहणी प्रसंगी अजय फटांगरे, वास्तुविशारद अरविंद वैद्य, नगरपालिकेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे, अभियंता पंकज मुंगसे यांच्यासह शहरातील विविध पदाधिकारी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

संगमनेरच्या सांस्कृतिक वैभवात मानाचा तुरा

संगमनेरला कवी अनंत फंदी यांच्यापासून ते शाहीर विठ्ठल उमप, पद्मश्री रघुवीर खेडकर, कांताबाई सातारकर यांच्यासारख्या दिग्गज कलावंतांची समृद्ध परंपरा लाभली आहे. साहित्य, लोककला, नाटक, संगीत आणि सांस्कृतिक क्षेत्रात संगमनेरच्या अनेक कलावंतांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. या समृद्ध परंपरेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी शहरात दर्जेदार सांस्कृतिक सुविधा उपलब्ध होणे आवश्यक होते. त्याच दृष्टीने कवी अनंत फंदी नाट्यगृहाचा विकास हा संगमनेरच्या सांस्कृतिक वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सौ. दुर्गाताई तांबे यांच्या पुढाकारातून नगरपालिकेने या नाट्यगृहाच्या बंदिस्तीकरणाचा प्रस्ताव पुढे आणला. आमदार सत्यजित तांबे यांनी राज्यातील विविध आधुनिक नाट्यगृहांची पाहणी करून त्यातील आवश्यक सुविधा संगमनेरच्या नाट्यगृहात उपलब्ध व्हाव्यात, यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे स्थानिक कलाकारांना दर्जेदार आणि हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.कलाकारांसाठी हक्काचे व्यासपीठ, रसिकांसाठी कलानुभवया नाट्यगृहाच्या उभारणीसाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनीही भेट देऊन मार्गदर्शन केले आहे. विविध तज्ज्ञांच्या सूचनांचा विचार करून नाट्यगृह अधिक दर्जेदार आणि आधुनिक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.नाटक, संगीत, सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्याने आणि विविध कलाविष्कारांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या या नाट्यगृहामुळे संगमनेरमधील कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळणार आहे. तसेच प्रेक्षकांना उत्तम वातावरणात नाट्यप्रयोग आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेता येणार आहे. उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी आमदार सत्यजित तांबे यांनी आमदार निधीतून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची भूमिका घेतली आहे.एक हजार आसनक्षमता असलेले हे नाट्यगृह तालुका स्तरावरील आधुनिक सांस्कृतिक सुविधांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. नाट्यगृहाचे उर्वरित काम पूर्ण झाल्यानंतर येत्या काही दिवसांत ते रसिकांसाठी खुले होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे संगमनेरच्या सांस्कृतिक क्षेत्रात नव्या पर्वाची सुरुवात होणार असून, नाट्यगृहाची ‘तिसरी घंटा’ लवकरच घुमणार आहे.

तालुकास्तरावरील अद्ययावत नाट्यगृह ठरणार!
– आमदार सत्यजित तांबे

“संगमनेरने राज्याला आणि देशाला अनेक नामवंत कलावंत दिले आहेत. या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन करून तो नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे ही आपली जबाबदारी आहे. कवी अनंत फंदी यांच्या नावाने उभारण्यात येत असलेले एक हजार आसनक्षमतेचे बंदिस्त नाट्यगृह या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आधुनिक सुविधा आणि प्रेक्षकांच्या सोयी लक्षात घेऊन साकारले जाणारे हे नाट्यगृह तालुका स्तरावर विशेष महत्त्वाचे ठरेल. काम अंतिम टप्प्यात आले असून, उर्वरित कामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देत ते लवकरात लवकर रसिकांच्या सेवेत दाखल करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या नाट्यगृहामुळे स्थानिक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळेल आणि संगमनेरच्या सांस्कृतिक परंपरेला नवी ऊर्जा मिळेल.”

– आमदार सत्यजित तांबे
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!