ब्रेकिंग
आपली लढाई गुलामगिरी संपविण्यासाठी – काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात
आपली लढाई गुलामगिरी संपविण्यासाठी – काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात

राहाता । विनोद जवरे ।
राहाता तालुक्यातील जनतेला गुलामगिरीत ढकलणाऱ्यांच्या विरोधात आपली लढाई आहे. पैसा आणि दहशतीचा वापर करून येथील जनतेला वर्षानुवर्ष गुलामीत टाकणाऱ्यांना जनतेची ताकद दाखवून देण्याची वेळ आलेली आहे. जनतेपर्यंत जा, त्यांच्यात जागृती करा. ही लढाई आपल्याला जनतेला सोबत घेऊनच लढायची आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केले.
राहता तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी जेष्ठ नेते थोरात बोलत होते. व्यासपीठावर काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे, महासचिव उत्कर्षा रूपवते, ज्येष्ठ नेते डॉ. एकनाथ गोंदकर, तालुकाध्यक्ष एड. पंकज लोंढे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.शिर्डी शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी सचिन चौगुले यांच्या निवडीची घोषणा यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी केली. ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते निवडीचे पत्र देऊन चौगुले यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
थोरात म्हणाले, मी राहात्यात येतो ते चांगले करण्यासाठी. जनतेच्या मनात येथे बदल घडावा अशी सुप्त इच्छा आहे. बाजार समितीची निवडणूक असो किंवा गणेश सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जनतेने आपली भावना मुक्तपणे बोलून दाखवली आहे. धन सत्तेच्या विरोधातील ही लढाई लढताना जनता आपल्या सोबत आहे. हत्ती कितीही मोठा असला तरीही मुंगी त्याला नाचवू शकते, पराभूत करू शकते हे कोणीही विसरू नये. वर्षानुवर्ष धाक दाखवून या तालुक्यातील जनतेला गुलाम बनविण्याचे काम येथील नेतृत्वाने केलेले आहे, आपल्याला ती गुलामगिरी संपवायची आहे.साईबाबा संस्थानच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी बांधण्यात आलेली दर्शन रांग खुली करावी ही विनंती मी यापूर्वीही केली होती मात्र पंतप्रधानांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करायचे असे आम्हास कळाले. आम्ही तेव्हाच सांगितलं होतं, तुम्हाला उद्घाटन कधी करायचं तेव्हा करा, पण ती दर्शन रांग खुली करून द्या. आता ज्येष्ठ नेते डॉ. एकनाथ गोंदकर यांनी शासनाला निर्वाणीचा इशारा दिला आहे. येत्या 14 तारखेपर्यंत दर्शन रांग आणि शैक्षणिक संकुलाचे लोकार्पण करा, पिंपळवाडी रोड खुला करा आदी मागण्यासाठी ते प्राणांतिक उपोषण करणार आहे. मी देखील या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी तातडीने पत्र व्यवहार करून संवाद करतो. जनतेच्या आणि भाविकांच्या हिताचे विषय असे उद्घाटनाच्या हट्टपायी रखडून राहू नये, अशी आमची अपेक्षा आहे.नागवडे म्हणाले, जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून राहत्यातल्या विविध गावांमध्ये पोहोचलेल्या राहता तालुका काँग्रेस कमिटीचे मी कौतुक करतो. काँग्रेसचा विचार हा जनसामान्यांचा विचार आहे, जनतेला भारतीय जनता पक्षाचा फोलपणा लक्षात आलेला आहे. त्यामुळे आपण लोकांकडे पोहोचले पाहिजे, त्यांची दुःख आणि वेदना समजून घेतली पाहिजे.डॉ. गोंदकर यांनी सांगितले, सध्या संस्थानच्या मार्फत शिर्डी बाहेर मंदिर बांधणे किंवा जागा घेणे अशा संदर्भातली काही चर्चा सुरू आहे, मात्र आम्ही शिर्डीतील ग्रामस्थांनी एकत्र येऊन या सर्व गोष्टींना विरोध केला आहे. हे सर्व करण्यापेक्षा इथेच भाविकांना अधिकाधिक सुविधा कशा देता येतील यावर काम होणे आवश्यक आहे. वैद्यकीय उपचारांसाठी देशभरातून लोक शिर्डी येथे येतात तिथे चांगल्या सुविधा देणे, त्याच्यामध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे. साई भक्तांच्या भोजनाच्या व्यवस्थेत सुधारणा होणे गरजेचे आहे. याशिवाय भक्तांच्या सोयीसाठी इतरही अनेक गोष्टी कराव्या लागतील. संस्थानाने त्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी आमची भूमिका आहे. अनेक सुविधा तयार झालेल्या आहेत मात्र फक्त पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करायचे म्हणून गेल्या अनेक दिवसांपासून त्या रखडलेल्या आहेत. येत्या 14 तारखेपर्यंत त्यांचे लोकार्पण झाले नाही तर मी प्राणांतिक उपोषण करण्याचा इशारा मी शासनाला दिलेला आहे. याशिवाय संस्थानच्या विद्युत विभागात मधल्या काळात काही चोरी झाली, मात्र हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे, याबाबतही मी आवाज उठवलेला आहे.यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष पंकज लोंढे यांनी जनसंवाद यात्रेचा आढावा दिला.


भाविकांच्या असुविधेचा प्रश्न विधानसभेत मांडणार
दर्शन रांगेचे काम होऊन काही महिने उलटलेले आहे. शैक्षणिक संकुल ही तयार आहे या सर्व सुविधांचे वेळेत लोकार्पण झाले तर भाविकांनाच त्याचा फायदा होईल, मात्र केवळ उद्घाटनाच्या हट्टापायी त्या सुविधा खुल्या केल्या जात नाही, ज्येष्ठ नेते डॉ. एकनाथ गोंदकर यांनी सुद्धा या संदर्भाने शासनाला प्राणांतिक उपोषणाचा इशारा दिला आहे. मी या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून परिसराची भावना कळवणार आहे. याशिवाय विधानसभेत सुद्धा, हे विषय मी आग्रहाने मांडेल, असे आमदार थोरात यांनी सांगितले.