केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह आपल्या सर्वांसाठी त्यांचा दौरा हा नवी उर्जा देणारा ठरणार – विखे पाटील
केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह आपल्या सर्वांसाठी त्यांचा दौरा हा नवी उर्जा देणारा ठरणार – विखे पाटील

उत्तर नगर जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न
लोणी । प्रतिनिधी । सहकारी संस्थांना पाठबळ देण्यासाठी केंद्र सरकारकडून होणारे निर्णय या चळवळीला पुढे घेवून जाण्यासाठी उपयुक्त ठरत आहेत. त्यामुळेच सहकाराच्या भूमीत केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांचे दुस-यांदा होणारे आगमन ही प्रवरा परिवारासाठी ऐतिहासिक घटना असल्याचे प्रतिपादन जलसंपदा तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

रविवार दिनांक ५ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित भाई शहा यांच्या उपस्थितीमध्ये पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे नूतनीकरण, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्ण कृती पुतळ्याचे पुतळ्याचे लोकार्पण आणि जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.या पार्श्वभूमीवर उत्तर नगर जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणा-या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्यासह केंद्रीय मंत्री आणि राज्यातील मंत्री उपस्थित राहणार असल्याचे सांगून मंत्री विखे पाटील म्हणाले की, अमित शाह यांच्यासह मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची या कार्यक्रमास लाभलेली उपस्थिती हा प्रवरा परिवारासाठी आनंदाचा क्षण आहे.यापुर्वी सहकार परिषदेच्या निमित्ताने अमित शाह या सहकाराच्या भूमित आले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय सहकार मंत्रालय सहकारी साखर कारखानदारीसाठी आणि सहकारी संस्थांसाठी राष्ट्रीय सहकार धोरणाच्या माध्यमातून घेत असलेल्या निर्णयांमुळे सहकार चळवळीला मोठी बळकटी मिळत आहे. साखर कारखानदारीला केंद्र सरकारच्या धोरणामुळे नवी दिशा मिळत आहे. यापुर्वी कारखान्यांवरील आयकराचा बोजा कमी करुन, इथेनॉल बाबत घेतलेल्या धोरणामुळे राज्यातील सहकारी साखर कारखाने टिकू शकले. यासर्व निर्णय प्रक्रीयेत केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या बरोबरीनेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिकाही महत्वपूर्ण ठरली.

अहिल्यानगर जिल्ह्यात मंत्री अमित शाह यांचे भव्य स्वागत होण्याच्या दृष्टीने महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत. आपल्या सर्वांसाठी त्यांचा दौरा हा नवी उर्जा देणारा ठरणार आहे. राज्यातील सरकारच्या पाठीशी अमित शाह यांच्यासारखे नेतृत्व खंबीरपणे उभे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याला पुढे घेवून जाण्याचे काम यशस्वीपणे करीत आहेत. येणा-या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेला हा दौरा महायुती करीता महत्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी माजी आमदार वैभव पिचड यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रारंभी महामंत्री सिताराम भांगरे यांनी प्रास्ताविक केले तर आभार मनोज पारधे यांनी मानले. या बैठकीस भाजपाचे उत्तर जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, माजी आ.वैभव पिचड, भाजपाचे महामंत्री सिताराम भांगरे, जिल्हा मोर्चा अध्यक्ष रोहित चौधरी, प्रवरा बँकेचे अध्यक्ष डॉ.भास्करराव खर्डे, उपाध्यक्ष मच्छिंद्र थेटे, कैलास तांबे, ट्रक वाहतूक संस्थेचे नंदकिशोर राठी, सोपानराव शिरसाठ, दिलीप त्रिभुवन, शोभा घोरपडे आदींसह भाजपाचे पदाधिकारी आणि परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



