ब्रेकिंग

अंजनापूर ग्रामस्थांचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार – जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया

ग्रामसंवाद कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांची ग्वाही

अंजनापूर ग्रामस्थांचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार – जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया

जाहिरात मो-7756045359

ग्रामसंवाद कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांची ग्वाही

कोपरगाव । विनोद जवरे । कोपरगाव तालुक्यातील अंजनापूर येथे आयोजित ‘ग्रामसंवाद’ कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. ग्रामस्थांनी मांडलेल्या विविध समस्यांवर सर्व शासकीय विभागांशी समन्वय साधून जास्तीत जास्त प्रश्न मार्गी लावले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी आमदार आशुतोष काळे उपस्थित होते.

उपलब्ध विकासनिधी व तांत्रिक बाबींचा विचार करून गावातील प्रलंबित कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी डॉ. बाबासाहेब कोळेकर, उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, तहसीलदार महेश सावंत, सरपंच कविता गव्हाणे व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.या बैठकीत रस्ते, वीज व पाणी या मूलभूत सुविधांवर प्रामुख्याने चर्चा झाली. जिल्हाधिकारी म्हणाले, गावांतर्गत रस्ते तसेच कोपरगाव-संगमनेर रस्त्याची दुरवस्था दूर करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कार्यवाही केली जाईल. महावितरणच्या रोहित्रांबाबत वारंवार उद्भवणाऱ्या समस्या तसेच पाणीवाटपाशी संबंधित प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी महसूल प्रशासन सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या काही वर्षांच्या आकडेवारीनुसार गावात एक हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण केवळ सातशे ते आठशे इतके असल्याची बाब अत्यंत चिंताजनक असून, ग्रामपंचायत व प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरा विलगीकरण अधिक प्रभावीपणे राबविण्यात यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. गावात राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा तसेच दर्जेदार मोबाईल नेटवर्क उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत असल्याचे चर्चेतून समोर आले. या समस्येच्या निराकरणासाठी दूरसंचार विभागाकडे अधिकृत प्रस्ताव पाठवून मोबाईल नेटवर्क सुधारण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच नागरिकांच्या सोयीसाठी विशेष शिबिरे आयोजित करून आधार कार्ड अद्ययावतीकरण, शिधापत्रिका व आयुष्मान भारत योजनेशी संबंधित प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

गावाने वृक्षारोपण व सामाजिक कामांत घेतलेल्या पुढाकाराचे तसेच स्थानिक तरुणांच्या कार्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष कौतुक केले. अत्यल्प पूर्वसूचनेवर आयोजित करण्यात आलेल्या या गावभेट कार्यक्रमाला ग्रामस्थांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.आमदार श्री.काळे म्हणाले, अंजनापूर व परिसरातील गावांचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी निळवंडे प्रकल्प, गोदावरी कालवा व उजनी उपसा जलसिंचन योजनेचा मोठा फायदा होत आहे. भाविकांमुळे सावळीविहीर ते कोल्हार मार्गावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी झगडे फाटा ते तळेगाव दिघे राज्य मार्गाचे काम तातडीने पूर्ण करण्याची गरज आहे. राज्य शासनाकडून वीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेल्या या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग व इतर संबंधित यंत्रणांनी प्राधान्याने मार्गी लावावे. तसेच गावातील रस्ते, वीज जोडणी व महावितरणच्या प्रलंबित समस्या प्रशासनाने तातडीने सोडवाव्यात, अशा सूचनाही त्यांनी केल्या.अपर जिल्हाधिकारी श्री. कोळेकर म्हणाले, ग्रामस्थांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. राज्य शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीचा प्रत्यक्ष आढावा या उपक्रमाद्वारे घेण्यात येत आहे. तसेच या योजना राबविताना येणाऱ्या अडचणी व त्याबाबत नागरिकांचा अभिप्राय शासनापर्यंत पोहोचविण्याचे काम प्रशासन करेल, जेणेकरून धोरणात्मक पातळीवर आवश्यक ते सकारात्मक बदल करता येतील.प्रास्ताविकात तहसीलदार श्री.सावंत म्हणाले की, अंजनापूर गावाने १६ हजार वृक्षांची लागवड व जोपासना करून जिल्ह्यातील इतर गावांसमोर आदर्श निर्माण केला आहे.कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी नव्याने मंजूर झालेल्या ४६ ट्रॅक्टरपैकी काही ट्रॅक्टरच्या चाव्या, ‘आत्मा’ अंतर्गत पीक प्रात्यक्षिकासाठी बियाणे तसेच विविध शासकीय योजनांचे लाभ प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना वितरित करण्यात आले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!