ब्रेकिंग

नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे व ‘I Love Sangamner’च्या पुढाकारातून गुरुपौर्णिमा भक्तिभावाने साजरी

दर्शन, पूजन, महाप्रसाद वितरण व नागरिकांशी संवाद; शहरभर भक्तिमय वातावरण

नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे व ‘I Love Sangamner’च्या पुढाकारातून गुरुपौर्णिमा भक्तिभावाने साजरी

जाहिरात मो-7756045359

दर्शन, पूजन, महाप्रसाद वितरण व नागरिकांशी संवाद; शहरभर भक्तिमय वातावरण

संगमनेर । प्रतिनिधी । भारतीय संस्कृतीतील गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व अधोरेखित करणारा गुरुपौर्णिमेचा पवित्र उत्सव संगमनेर शहरात मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. संगमनेरच्या नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि  ‘I Love Sangamner च्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांना नागरिक आणि भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


गुरुपौर्णिमेनिमित्त शहरातील दत्त मंदिर (बस स्टँड), स्वामी समर्थ केंद्र (म्हाळुंगी पूल) तसेच गंगामाता मंदिर (गंगामाई घाट) येथे विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. मैथिली तांबे यांनी विविध मंदिरांना भेट देऊन श्री दत्त महाराज, श्री स्वामी समर्थ आणि गंगामातेचे दर्शन घेत विधीवत पूजन केले. सर्व नागरिकांच्या सुख-समृद्धी, उत्तम आरोग्य आणि शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्यांनी मनोभावे प्रार्थना केली.याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसाद कार्यक्रमात उपस्थित राहून डॉ. मैथिली तांबे यांनी भाविकांना स्वतः महाप्रसादाचे वाटप केले. मंदिर परिसरात उपस्थित असलेल्या ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक आणि लहान मुलांशी त्यांनी मनमोकळा संवाद साधत सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. मोठ्या संख्येने भाविकांनी या धार्मिक कार्यक्रमात सहभाग नोंदवत भक्तिमय वातावरणाचा आनंद घेतला.

गुरु म्हणजे केवळ शिक्षण देणारी व्यक्ती नसून जीवनाला योग्य दिशा देणारा, संस्कारांची शिकवण देणारा आणि समाजाला प्रगतीच्या मार्गावर नेणारा दीपस्तंभ आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने प्रत्येकाने आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या विचारांचा आणि संस्कारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प करावा, असा संदेश यावेळी देण्यात आला.I Love Sangamner’ या माध्यमातून शहरात सामाजिक, सांस्कृतिक आणि जनजागृतीपर उपक्रम सातत्याने राबविले जात असून, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून अध्यात्म, सामाजिक एकात्मता आणि सेवाभावाचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. धार्मिक परंपरा जपत समाजात सकारात्मक विचार, बंधुभाव आणि परस्पर सहकार्याची भावना अधिक दृढ करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंदिर समित्यांचे पदाधिकारी, स्वयंसेवक, ‘I Love Sangamner’चे कार्यकर्ते तसेच उपस्थित भाविकांनी मोलाचे सहकार्य केले. भक्ती, श्रद्धा आणि सेवाभावाने नटलेला हा गुरुपौर्णिमा सोहळा संगमनेरकरांच्या स्मरणात कायम राहील, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!