ब्रेकिंग

चुलत्यांचे मार्गदर्शन अन् पुतण्याची जिद्द; थोरात कुटुंबाची यशस्वी वाटचाल!

कष्ट, प्रामाणिकपणा आणि जिद्दीच्या जोरावर पुण्यात उद्योजक म्हणून उभी केली वेगळी ओळख

चुलत्यांचे मार्गदर्शन अन् पुतण्याची जिद्द; थोरात कुटुंबाची यशस्वी वाटचाल!

कष्ट, प्रामाणिकपणा आणि जिद्दीच्या जोरावर पुण्यात उद्योजक म्हणून उभी केली वेगळी ओळख

कोपरगाव । प्रतिनिधी । स्वप्न पाहण्यासाठी मोठी परिस्थिती असावी लागते असे नाही, तर ते पूर्ण करण्यासाठी जिद्द, मेहनत आणि प्रामाणिकपणा असावा लागतो. याचाच प्रत्यय जवळके गावचे भूमिपुत्र प्रशांत वसंत थोरात यांच्या यशस्वी वाटचालीतून येत आहे. ग्रामीण भागातून पुण्यासारख्या मोठ्या शहरात जाऊन उद्योजक म्हणून स्वतःची ओळख निर्माण करत अवघ्या १६ महिन्यांच्या कालावधीत आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरविण्याची कामगिरी त्यांनी केली आहे.

प्रशांत थोरात यांनी नुकतीच नवीन चारचाकी गाडी खरेदी केली. ही केवळ एका गाडीची खरेदी नसून त्यामागे अनेक दिवसांची मेहनत, संघर्ष, जिद्द आणि वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याची भावना दडलेली आहे. विशेष म्हणजे, स्वतःचे स्वप्न पूर्ण करतानाच वडिलांच्या स्वप्नालाही बळ देण्याचे काम त्यांनी केले आहे.

यशाच्या वाटचालीत चुलत्यांची मोलाची साथ!

प्रशांत थोरात यांच्या यशस्वी व्यावसायिक वाटचालीत त्यांचे चुलते संजय उर्फ वेणुनाथ थोरात यांची मोलाची साथ लाभली आहे. व्यवसायातील मार्गदर्शन, अनुभवाची शिदोरी आणि खंबीर पाठबळ यामुळे प्रशांत यांच्या स्वप्नपूर्तीच्या प्रवासाला नवी दिशा मिळाली. चुलते-पुतणे हे नाते केवळ कौटुंबिक जिव्हाळ्यापुरते मर्यादित न राहता एकमेकांच्या प्रगतीत सहभागी होणारे ठरले आहे. खऱ्या अर्थाने नात्यातील विश्वास आणि एकजुटीचे हे सुंदर उदाहरण आहे.

प्रशांत अत्यंत कष्टाळू, प्रामाणिक आणि जिद्दी स्वभावाचे आहेत. कोणतेही काम लहान-मोठे न मानता सातत्याने मेहनत करण्याची वृत्ती त्यांच्या यशामागे आहे. या दोघांच्या कष्टाला कुटुंबातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद यांचीही भक्कम साथ लाभली आहे. त्यांचे चुलते संजय उर्फ वेणुनाथ थोरात यांच्यासोबत असलेले जिव्हाळ्याचे नातेही विशेष उल्लेखनीय आहे.

चुलते आणि पुतणे यांच्यातील नातं हे केवळ रक्ताचं नातं नसून विश्वास, प्रेम, मार्गदर्शन आणि एकमेकांच्या यशात आनंद मानण्याचं नातं असतं. थोरात कुटुंबातील हे नातं आजही तितक्याच आपुलकीने जपले जात असल्याचे पाहायला मिळते.

पुण्यात उद्योजक म्हणून कार्यरत असतानाही प्रशांत यांनी आपल्या ग्रामीण मातीशी असलेली नाळ तुटू दिलेली नाही. गाव, माणसं, नाती आणि संस्कार यांच्याशी जोडलेली त्यांची ओळख आजही कायम आहे. शहरात यश मिळवताना गावाचा विसर न पडणे, हीच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख म्हणावी लागेल.अवघ्या १६ महिन्यांत मेहनतीच्या जोरावर स्वप्नपूर्तीचा आनंद मिळविणाऱ्या प्रशांत थोरात यांच्या या यशाकडे केवळ वाहन खरेदी म्हणून न पाहता, ग्रामीण भागातील तरुणांसाठी प्रेरणादायी उदाहरण म्हणून पाहिले जात आहे. कारण परिस्थिती कोणतीही असो, मनात जिद्द आणि कुटुंबाची साथ असेल तर स्वप्नांना नक्कीच पंख मिळतात, हे प्रशांत आणि शुभम या थोरात बंधूंनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.प्रशांत थोरात यांच्या या यशाबद्दल थोरात परिवाराचे आणि जवळके ग्रामस्थांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून त्यांच्या पुढील व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!