उद्या जिल्हा बँकेच्या सत्तेचा फैसला; विखेंचा शब्द चालणार की थोरातांची रणनीती?

उद्या जिल्हा बँकेच्या सत्तेचा फैसला; विखेंचा शब्द चालणार की थोरातांची रणनीती?

सुजय विखे पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा; विखे-थोरातांच्या एकजुटीची खरी परीक्षा!
अहिल्यानगर । प्रतिनिधी । अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाचा फैसला उद्या, गुरुवार दि. १२ नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे राजकीय लक्ष या निवडीकडे लागले आहे. बँकेच्या निवडणुकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी एकत्र येत सहकार विकास आघाडीच्या माध्यमातून २१ पैकी १८ संचालकांचे पाठबळ मिळवले. मात्र, आता अध्यक्षपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार, हा चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.अध्यक्षपदाच्या शर्यतीत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. सुजय विखे पाटील यांच्याकडे जिल्हा बँकेचे नेतृत्व देण्याबाबत राजकीय वर्तुळात अनुकूल वातावरण असल्याचे बोलले जात आहे. मात्र, अंतिम निर्णय कोणाच्या बाजूने होतो, हे उद्याच स्पष्ट होणार आहे.या निवडणुकीतील सर्वाधिक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विखे-थोरात यांची राजकीय एकजूट. अनेक वर्षांचे राजकीय मतभेद बाजूला ठेवून दोन्ही नेत्यांनी सहकाराच्या निवडणुकीत एकत्र येण्याची भूमिका घेतली. या एकजुटीमुळे संचालक मंडळात बहुमत मिळाले. मात्र, अध्यक्षपदाच्या निवडीत ही एकजूट कितपत टिकते आणि नेतृत्वाबाबत एकमत होते का, याची खरी परीक्षा उद्या होणार आहे.पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा जिल्ह्यातील सहकार क्षेत्रावर असलेला प्रभाव आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची राजकीय रणनीती या दोन्ही बाबी उद्याच्या निवडीत महत्त्वाच्या ठरणार आहेत. अध्यक्षपदाच्या निवडीसाठी पडद्यामागे नेमकी कोणती राजकीय जुळवाजुळव झाली आहे, याबाबतही उत्सुकता आहे.

जिल्हा बँक ही केवळ आर्थिक संस्था नसून जिल्ह्यातील सहकार, साखर कारखाने, शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार आहे. त्यामुळे या बँकेचे नेतृत्व कोणाकडे जाते, याला विशेष महत्त्व आहे.उद्या अध्यक्षपदाचा निर्णय जाहीर होताच केवळ एका व्यक्तीच्या नावावर शिक्कामोर्तब होणार नाही, तर जिल्ह्यातील आगामी राजकीय समीकरणांची दिशाही स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या सत्तेचा हा फैसला अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.



