ब्रेकिंग

दर्शनरांगेचे तातडीने लोकार्पण करा – ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात

ग्रामस्थांना विश्वासात घेऊनच कारभार करा

दर्शनरांगेचे तातडीने लोकार्पण करा – ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात
ग्रामस्थांना विश्वासात घेऊनच कारभार करा
कोपरगांव । विनोद जवरे ।
साई भक्तांच्या सुविधेसाठी वर्षभरापासून तयार असलेली दर्शनरांग तातडीने खुली करा, उद्घाटनाला पंतप्रधानांचा वेळ मिळाला नाही तर भक्तांची वर्षानुवर्ष गैरसोय होऊ देणार का? असा प्रश्न उपस्थित करतानाच ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी संस्थान प्रशासनाने स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात घेऊनच कारभार करावा, त्यांच्यामुळेच आपण साई भक्तांना सोयी-सुविधा पुरवू शकतो, याची आठवण मुख्यमंत्री महोदयांना करून दिली.काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दर्शन रांग आणि शैक्षणिक संकुल तातडीने सुरू करण्याची मागणी केली.थोरात यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, मानवतेचा संदेश देणाऱ्या श्री साईबाबांच्या दर्शनासाठी जगभरातून भाविक भक्त तीर्थक्षेत्र, शिर्डी येथे येत असतात. शिर्डीतील ग्रामस्थ या भाविक भक्तांची आपुलकीने काळजी घेतात. असे असतानाही बरेचदा श्री साईबाबा संस्थान प्रशासनाकडून ग्रामस्थांना विश्वासात न घेता काही निर्णय घेतले जातात, त्यातून ग्रामस्थांच्या भावना दुखावल्या जातात. सध्या देखील शिर्डीच्या माजी नगराध्यक्षा श्रीमती अनिताताई जगताप यांच्यासह शिर्डीतील सर्वपक्षीय ग्रामस्थांचे  संस्थान प्रशासन घेऊ इच्छित असलेल्या निर्णया विरोधात उपोषण सुरु आहे. यासंदर्भात शासन स्तरावरून काळजी घेतली जावी, शेवटी शिर्डीतील स्थानिक नागरिकांमुळेच आपण साई भक्तांना सेवा आणि सुविधा योग्यरित्या पुरवू शकतो.थोरात लिहितात, साई भक्तांना ऊन वारा पाऊस याचा त्रास होऊ नये आणि दर्शनाची सुविधा सुलभ व्हावी यासाठी व्यवस्थापन समितीच्या वतीने दर्शन रांग बांधण्याचा निर्णय घेण्यात आला, गेल्या वर्षभरापासून दर्शन रांग बांधून पूर्ण झालेली आहे. आपल्याकडे सुसज्ज दर्शनरांग असतानाही भाविकांना उघड्यावर दर्शनासाठी उभे राहावे लागते. याशिवाय साईबाबा संस्थानच्यावतीने विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे म्हणून सुसज्ज शैक्षणिक संकुल बांधून पूर्ण झालेले आहे. महत्त्वाचे म्हणजे या सर्व सुविधा साईबाबा संस्थाननेच उभ्या केलेल्या आहे, त्यासाठी केंद्र किंवा राज्य सरकारकडून निधीही घेतलेला नाही. असे असतानाही या सुविधा खुल्या केल्या जात नाही, देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते या प्रकल्पांचे लोकार्पण करण्याचा सरकारचा मनोदय असल्याचे आम्हास कळाले होते. आमचीही त्याबाबत काहीही हरकत असण्याचे कारण नाही, मात्र केवळ उद्घाटनाला वेळ मिळत नाही म्हणून दर्शन रांग किंवा शैक्षणिक संकुलाचे लोकार्पण रोखणे हा भाविक भक्तांवर अन्याय ठरेल. पुढेही वर्षानुवर्षे उद्घाटनासाठी वेळ मिळाला नाही तर, तर आपण भाविक भक्तांची गैरसोय होऊ देणार का? त्यामुळे स्थानिक राजकीय हस्तक्षेपाला आणि दबावाला बळी न पडता, या सुविधा तातडीने सुरू केल्या गेल्या पाहिजे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्तिशः या प्रकरणात लक्ष घालावे आणि भाविक भक्तांसाठीच्या सोयीसुविधा तातडीने सुरू करून द्याव्यात.


ग्रामस्थांचे उपोषण सरकारसाठी भूषणावह नाही
भाविक भक्तांच्या सोयीसाठी शिर्डीतील ग्रामस्थांनी उपोषण करणे हे भूषणावह नाही, मुख्यमंत्री महोदयांनी पालक म्हणून या सर्व प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालावे, ग्रामस्थांमुळेच आपण साई भक्तांना सोयी सुविधा पुरवू शकतो, असेही थोरात म्हणाले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!