मेधा मधून विद्यार्थ्यांसाठी मोठी सकारात्मक ऊर्जा – डॉ.जयाताई थोरात
मेधा मधून विद्यार्थ्यांसाठी मोठी सकारात्मक ऊर्जा – डॉ.जयाताई थोरात
संगमनेर । विनोद जवरे ।
भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. सशक्त तरुण पिढी घडविण्यासाठी अमृतवाहिनी शिक्षण संस्थेने सातत्याने काम केले असून मेधा सांस्कृतिक महोत्सवांमधून विद्यार्थ्यांसाठी मोठी सकारात्मक ऊर्जा मिळत असल्याचे प्रतिपादन कॅन्सरतज्ञ डॉ. जयाताई थोरात यांनी केले आहे.
अमृतवाहिनीच्या मेधा महोत्सवातील अमृत कला मंच या ठिकाणी झालेल्या युवा संवाद या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी अध्यक्षस्थानी विश्वस्त सौ.शरयूताई देशमुख ह्या होत्या तर व्यासपीठावर, कार्पोरेट ट्रेनर डॉ.रत्नाकर आहिरे, रेडिओ जॉकी अक्षय, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्रा.व्ही.बी.धुमाळ, इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ.एम.ए.वेंकटेश,मेधाचे समन्वयक प्रा.जी.बी.काळे, प्राचार्य डॉ.मच्छिंद्र चव्हाण, डॉ. मनोज शिरभाते, डॉ बाबासाहेब लोंढे, प्रा एस.टी.देशमुख, सौ.जे.बी शेट्टी, श्रीमती शितल गायकवाड, श्रीमती अंजली कण्णावार, प्रा विलास शिंदे, प्रा.अशोक वाळे, नामदेव गायकवाड आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना डॉ.जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, तरुणांमध्ये मोठी शक्ती आहे. मात्र या शक्तीला योग्य दिशा देण्याची गरज आहे. अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सकारात्मक व सर्वांगीण व्यक्तिमत्त्वाचा विद्यार्थी घडवण्याचे काम होत आहे. मेधामध्ये विविध मोटिवेशनल व्याख्याते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांसाठी ही मोठी पर्वणी असून यातून सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे. मेधामुळे सर्वजण एकत्र येतात संवाद होतो.
सध्या युवकांमध्ये अस्वस्थपणा जास्त आहे. एकत्र आले आणि मोकळे बोलले तर अस्वस्थपणा दूर होईल. स्ट्रेस कमी करण्यासाठी बोलत रहा. स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. अभियंते हे नवनिर्मितीचे काम करत असतात कोणत्याही कामाकडे नव्या दृष्टिकोनातून पहा. ग्रामीण भागातील विद्यार्थी हे निसर्गाशी एकरूप झालेले असून त्यांना निसर्ग पर्यावरण विज्ञान याविषयी अधिक काम करता येईल. असे सांगताना स्वस्थ रहा, मस्त रहा, जबरदस्त रहा असा आरोग्याचा मौलिक सल्लाही त्यांनी दिला.
तर डॉ.रत्नाकर आहिरे म्हणाले, जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर महापुरुषांच्या नावाच्या फक्त घोषणा देण्याऐवजी त्यांचे विचार डोक्यात घ्या. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, डॉ.अब्दुल कलाम यांच्यावरील तीन – तीन पुस्तके वाचली तर प्रत्येकाला मोठी बौद्धिक ताकद मिळेल. मात्र सध्या सोशल मीडिया मुळे आपण वाचनाकडे दुर्लक्ष करतो. कोणतेही काम करताना निर्णय घ्या. चुकला तरी तो निर्णय आपला असेल. लोक काय म्हणतील याकडे दुर्लक्ष करा.जे इतरांकडे दुर्लक्ष करून काम करतात तेच पुढे यशस्वी होतात आणि मग सर्व त्यांच्याकडेच लक्ष देतात असेही त्यांनी सांगितले.तर रेडिओ जॉकी अक्षय यांनी मास कम्युनिकेशन, मीडिया विविध कार्यक्रम यामधून असलेल्या करिअरच्या संधी सांगताना सोशल मीडिया मधूनही चांगल्या व्यवसायाच्या चांगल्या संधी निर्माण होऊ शकतात असेही त्यांनी सांगितले.
यावेळी इंजिनिअरिंग कॉलेज, पॉलीटेक्निक, एमबीए, बी फार्मसी, डी फार्मसी, आयटीआय, जुनियर कॉलेज, मॉडेल स्कूल, इंटरनॅशनल स्कूल या विभागांमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते.
स्वच्छ व सुंदर अमृतवाहिनी शिक्षण मंदिर
अमृतवाहिनी हे शिक्षण मंदिर आहे. येथील प्रसन्नता, निसर्गाने नटलेले वातावरण, स्वच्छता, शिस्त, आणि गुणवत्ता पूर्ण शिक्षणाबरोबर प्रत्येक विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासाची काळजी हा पॅटर्न संपूर्ण देशातील शिक्षण प्रणालीसाठी आदर्शवत ठरणार असल्याचे गौरव गार कार्पोरेट ट्रेनर डॉ.रत्नाकर अहिरे यांनी काढले आहे.