ब्रेकिंग
पश्चिम बंगालमध्ये ‘जंगलराज’ संपुष्टात, तर राहुरीत कार्यकर्त्यांचा विजय; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया

पश्चिम बंगालमध्ये ‘जंगलराज’ संपुष्टात, तर राहुरीत कार्यकर्त्यांचा विजय; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया


पश्चिम बंगालमध्ये ‘जंगलराज’ संपुष्टात, तर राहुरीत कार्यकर्त्यांचा विजय; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया
लोणी । प्रतिनिधी । “पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेला विजय म्हणजे हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये सुरू असलेल्या विकास प्रक्रियेवर जनतेने दाखविलेला विश्वास असून, वर्षानुवर्षे तिथे सुरू असलेले ‘जंगलराज’ जनतेने संपुष्टात आणले आहे,” अशी प्रतिक्रिया जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली. राहुरी विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांचा विजय हा महायुतीचे कार्यकर्ते आणि जनतेचा विजय आहे. स्व. शिवाजीराव कर्डिले यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा विजय महत्त्वपूर्ण असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

“मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मतमोजणी केंद्रावर जाऊन विजयी उमेदवार अक्षय कर्डिले यांच्यासमवेत विजयाचे प्रमाणपत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून स्वीकारले. यावेळी आ. संग्राम जगताप यांच्यासह भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, शहराध्यक्ष अनिल मोहिते तसेच महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.””विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि रणनीतीकार अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाला पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक विजय मिळाला आहे. पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात घुसखोरी वाढली होती; गेली अनेक वर्षे तिथल्या जनतेला गुंडगिरी आणि दहशत सहन करावी लागत होती. या निवडणूक निकालाने ममता बॅनर्जी यांना जनतेने मोठी चपराक दिली असून, एकप्रकारे तिथले ‘जंगलराज’ जनतेने संपुष्टात आणले आहे.” “आसाममध्ये भारतीय जनता पक्षाने विजयाची हॅटट्रिक केल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. देशामध्ये काँग्रेस आता संपुष्टात आली आहे. केवळ देशाबाहेर जाऊन देशविरोधी वक्तव्य करण्यात या पक्षाच्या नेत्यांना आनंद वाटतो. तेवढा वेळ जर त्यांनी पक्षाच्या वाढीकरिता दिला असता, तर काहीतरी हाती आले असते. या निवडणुकीतील पराभव पाहता, काँग्रेस पक्ष आता विसर्जित करण्याची वेळ आली आहे,” असा टोमना त्यांनी राहुल गांधी यांना लगावला. “राज्यातील काही पक्ष ममता बॅनर्जींच्या संपर्कात होते, त्यांनाही या निकालाने धडा मिळाला आहे. भविष्यात अशीच परिस्थिती शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटाची होईल,” असे सूचक विधानही त्यांनी यावेळी केले. “राहुरी विधानसभा मतदारसंघातील विजय हा महायुतीच्या कार्यकर्त्यांचा असला, तरी स्व. शिवाजीराव कर्डिले यांच्या कार्याचा तो खऱ्या अर्थाने विजय आहे. या निवडणुकीत समन्वयाची भूमिका घेतल्याबद्दल माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचेही आभार मानून मंत्री विखे पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुकीची तयारी केली होती.”


