प्रशासनाने करुले गावचे पिण्याचे पाणी बंद केल्याने नागरिकांमध्ये संताप

प्रशासनाने करुले गावचे पिण्याचे पाणी बंद केल्याने नागरिकांमध्ये संताप

तळेगाव दिघे । प्रतिनिधी । तळेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना दोन वर्षापासून बंद असून प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा पिण्याच्या पाण्याबाबत सरकारने अत्यंत दुर्लक्ष केले आहे. याचबरोबर जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी आडमुठे धोरण घेत पालकमंत्री व नवीन लोकप्रतिनिधी यांच्या दबावातून करूले गावची पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन जाणीवपूर्वक बंद केली असल्याने नागरिकांचे पिण्याच्या पाण्याचे मोठे हाल झाले आहे.

करुले गावचे सरपंच बाळासाहेब आहेर यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, दोन वर्षापासून तळेगाव पाणीपुरवठा योजना बंद आहे .ही योजना सुरळीत व्हावी यासाठी प्रशासनाला वारंवार निवेदने दिली आहेत मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही होत नाही. पाणीटंचाई असताना जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाणीपुरवठा योजनेचे कनेक्शन तोडून टाकले .यामुळे आम्हाला पाणी मिळत नाही. भर उन्हाळ्यामध्ये नागरिक पाण्यासाठी वनवन भटकत आहे.निळवंडे धरण व कालवे हे दुष्काळग्रस्त भागासाठी लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी निर्माण केले आहे .मात्र सध्याचे पालकमंत्री आणि नवीन लोकप्रतिनिधी हे पाण्याबाबत पूर्ण राजकारण करत आहेत. निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी राहता तालुक्यातील बंधारे आणि नदी नाल्यांमध्ये सोडले जात आहे. मात्र संगमनेर तालुक्यातील जनतेला पिण्यासाठी सुद्धा पाणी मिळत नाही हे अत्यंत मोठी शोकांतिका आहे.निळवंडे चा डावा कालवा आमच्या शिवारातून जात असून आम्हाला पाणी मिळत नाही. पिण्याच्या पाण्याची योजना बंद झाली आहे. जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी कनेक्शन तोडून पाणीपुरवठा बंद केल्याने पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.याबाबत पालकमंत्री, नवीन लोकप्रतिनिधी ,शिर्डी विभागाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, यांच्यासह तहसीलदार ,प्रांताधिकारी, गटविकास अधिकारी यांना वेळोवेळी पत्र व्यवहार केला आहे. मात्र कोणाकडूनही प्रतिसाद मिळत नाही. पूर्णपणे राजकारण केले जात आहे.जर पाणी मिळाले नाही, तर रास्ता रोको सह तीव्र आंदोलन उभारले जाईल पाण्यासाठी हा लढा असून याला संपूर्णपणे सध्याचे प्रशासन जबाबदार आहे. अधिकाऱ्यांवर दबाव आणून पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन जाणीवपूर्वक बंद केली आहे. तातडीने सुरू न केल्यास आत्मदहन करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.


