“आज तरी येईल पाऊस…” रोजच्या आशेवर जगतोय बळीराजा; पिकांसाठी परमेश्वराला साकडं
रोज आभाळाकडे नजर, मनात एकच आस… “देवा, पाऊस पाड अन् माझं पीक वाचव!”

“आज तरी येईल पाऊस…” रोजच्या आशेवर जगतोय बळीराजा; पिकांसाठी परमेश्वराला साकडं


रोज आभाळाकडे नजर, मनात एकच आस… “देवा, पाऊस पाड अन् माझं पीक वाचव!”
कोपरगांव । विनोद जवरे । गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी राजा मोठ्या चिंतेत सापडला आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांचे डोळे आता आभाळाकडे लागले असून, पिकांची अवस्था दिवसेंदिवस चिंताजनक होत आहे.

पावसाच्या सुरुवातीला झालेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने खरीप पिकांची पेरणी केली. मात्र त्यानंतर पावसाने अचानक उघडीप दिल्याने पिकांना आवश्यक पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. पाऊस आणखी काही दिवस लांबला तर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. माझा शेतकरी राजा दररोज पावसाची वाट पाहत असतो. सकाळी उठल्यापासून आभाळाकडे पाहत, आज तरी पाऊस येईल का, या आशेवर त्याचा प्रत्येक दिवस जात आहे. शेतात उभे असलेले पीक, त्यासाठी केलेला खर्च आणि घेतलेले कर्ज यांचा विचार करत बळीराजाची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. राबराब राबून, कष्ट करून आणि मोठा खर्च करून उभे केलेले पीक डोळ्यांसमोर वाया जाऊ नये, एवढीच शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. त्यामुळे अनेक शेतकरी बांधवांनी परमेश्वराकडे मनोभावे प्रार्थना करत, “हे देवा, चांगला पाऊस पडू दे; आमचे पीक वाया जाऊ देऊ नकोस,” अशी आर्त हाक दिली आहे. पावसावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांसाठी येणारे दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. वरुणराजाने लवकर हजेरी लावून तहानलेल्या पिकांना जीवदान द्यावे आणि बळीराजाच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद फुलावा, अशीच अपेक्षा शेतकरी बांधव व्यक्त करत आहेत.



