ब्रेकिंग

“सर्वसामान्यांना दर्जेदार आरोग्यसेवा देण्यासाठी आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करा – आमदार सत्यजीत तांबे

आरोग्य योजनांतील उणिवा दूर करून शासकीय आरोग्य सेवा बळकट करण्याची मागणी; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे सकारात्मक आश्वासन

“सर्वसामान्यांना दर्जेदार आरोग्यसेवा देण्यासाठी आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करा – आमदार सत्यजीत तांबे

जाहिरात मो-7756055359

आरोग्य योजनांतील उणिवा दूर करून शासकीय आरोग्य सेवा बळकट करण्याची मागणी; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे सकारात्मक आश्वासन

मुंबई । प्रतिनिधी । राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आणि परवडणाऱ्या आरोग्य सुविधा मिळण्यासाठी शासकीय आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करणे, आयुष्मान भारत व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणे, तसेच खासगी रुग्णालयांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्याची गरज असल्याचे विधानपरिषद आमदार सत्यजीत तांबे यांनी अर्धा तास चर्चेदरम्यान मांडले.

आमदार तांबे यांनी सांगितले की, राज्यात शासकीय रुग्णालयांमधील मनुष्यबळाची कमतरता, औषधांचा तुटवडा आणि उपचारांतील विलंब यामुळे मोठ्या प्रमाणावर रुग्णांना खासगी रुग्णालयांकडे जावे लागत आहे. आयुष्मान भारत आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेमुळे मोठा आधार मिळत असला तरी अनेक आजार आणि अनेक नामांकित रुग्णालये अद्याप या योजनांच्या कक्षेबाहेर आहेत. त्यामुळे मुंबई-पुण्यातील प्रमुख रुग्णालयांनी या योजनांमध्ये सहभागी व्हावे यासाठी शासनाने आवश्यक ती भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.मुख्यमंत्री सहायता निधीची प्रक्रिया अधिक सुलभ करून लोकप्रतिनिधींनाही ऑनलाइन प्रस्ताव सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, सर्व शासकीय रुग्णालयांचे स्वतंत्र संस्थेमार्फत नियमित गुणवत्ता मूल्यमापन (ऑडिट) करावे, ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णांची डिजिटल आरोग्य नोंद प्रणाली विकसित करावी तसेच कम्युनिटी हेल्थ ऑफिसर पदासाठी होमिओपॅथी डॉक्टरांनाही संधी द्यावी, अशी मागणीही सत्यजीत तांबे यांनी केली. याशिवाय आयुष्मान भारत योजनेत समाविष्ट नसलेल्या आजारांबाबत शासनाने स्पष्ट धोरण जाहीर करण्याची तसेच कामगार रुग्णालयांनाही या आरोग्य व्यवस्थेशी जोडण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.यावर उत्तर देताना आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आमदार सत्यजीत तांबे यांनी मांडलेल्या अनेक सूचनांचे स्वागत केले. राज्यातील शासकीय आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी ग्रामीण रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आयुष्मान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेससारख्या संस्थेमार्फत आरोग्य व्यवस्थेचे ऑडिट करण्याच्या सूचनेचाही सकारात्मक विचार करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. मंत्री आबिटकर म्हणाले की, ग्रामीण भागातील आरोग्य सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी डॉक्टरांना अधिक प्रोत्साहन देण्यात येत असून, शासकीय रुग्णालयांमध्ये या योजनांचा विस्तार करण्यात आला आहे. तसेच आयुष्मान भारत योजनेचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचावा, यासाठी जनजागृती आणि दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्यावर शासनाचा भर असल्याचे त्यांनी सांगितले. आमदारांनी केलेल्या सूचनांचा विचार करून आरोग्य सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, अशी सकारात्मक ग्वाहीही त्यांनी दिली.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!