गोदावरी नदीपात्रातील अवैध वाळू वाहतुकीवर गुन्हे शाखेची कारवाई
ट्रॅक्टर-ट्रॉलीसह ५ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त; एकास ताब्यात

गोदावरी नदीपात्रातील अवैध वाळू वाहतुकीवर गुन्हे शाखेची कारवाई


ट्रॅक्टर-ट्रॉलीसह ५ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त; एकास ताब्यात
कोपरगाव । प्रतिनिधी । कोपरगाव तालुक्यातील सांगवी भुसार शिवारातील गोदावरी नदीपात्रातून अवैधरीत्या वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्याविरुद्ध अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली. या कारवाईत ट्रॅक्टर-ट्रॉली व वाळूसह एकूण ५ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, सम्यक बाळासाहेब मेहेरखांब (वय २०, रा. सांगवी भुसार, ता. कोपरगाव) याला ताब्यात घेण्यात आले.

अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार अतुल लोटके, निळकंठ कारखेले, रणजीत जाधव, योगेश कर्डीले व दीपक जाधव यांच्या पथकाने कोपरगाव तालुका पोलीस ठाणे हद्दीत कारवाई केली.१२ ऑगस्ट रोजी पथकाला गुप्त बातमीदारामार्फत सांगवी भुसार शिवारातील गोदावरी नदीपात्रातून वाळूचा अवैध उपसा करून वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने पंचांसमक्ष नदीपात्राजवळ जाऊन पाहणी केली असता निळ्या रंगाच्या पॉवरट्रॅक कंपनीच्या ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये वाळू भरून वाहतुकीच्या तयारीत असलेला संशयित आढळून आला.तपासणी केली असता ट्रॉलीमध्ये वाळू आढळून आली. पोलिसांनी सम्यक मेहेरखांब याला ताब्यात घेत ट्रॅक्टर-ट्रॉलीची किंमत ५ लाख रुपये व वाळूची किंमत १० हजार रुपये असा एकूण ५ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३४२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०३(२) तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियमातील कलम ३ व १५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस ठाणे करीत आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.



