मुलगा-सुनेने आई-वडिलांचे स्वप्न केले साकार; तिरुपती बालाजीसह कर्नाटकातील धार्मिक स्थळांचे घडविले दर्शन!

मुलगा-सुनेने आई-वडिलांचे स्वप्न केले साकार; तिरुपती बालाजीसह कर्नाटकातील धार्मिक स्थळांचे घडविले दर्शन!

आयुष्यभर कष्ट करणाऱ्या आई-वडिलांना दिला आनंदाचा अविस्मरणीय ठेवा
कोपरगाव । प्रतिनिधी । आई-वडील आपल्या मुलांच्या सुखासाठी संपूर्ण आयुष्य झिजवतात. स्वतःच्या इच्छा, आवडी-निवडी बाजूला ठेवून मुलांच्या शिक्षणासाठी, प्रगतीसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी कष्टाची पराकाष्ठा करतात. मात्र, जेव्हा हीच मुले मोठी होऊन आई-वडिलांच्या स्वप्नांना आपल्या कर्तृत्वाची जोड देतात, तेव्हा त्यांच्या आयुष्याचे खरे सार्थक होते. असाच हृदयस्पर्शी अनुभव कोपरगाव तालुक्यातील जवळके येथील वसंत कारभारी थोरात यांच्या कुटुंबात पाहायला मिळाला आहे.

वसंत कारभारी थोरात यांनी संपूर्ण आयुष्य शेती आणि कष्टात घालवले. मुलगा शुभम थोरात याला उच्च शिक्षण देण्यासाठी त्यांनी परिस्थितीशी दोन हात केले. स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून मुलाच्या शिक्षणाला प्राधान्य दिले. त्यांच्या या त्यागाची जाणीव मुलगा शुभम याने मनात कायम जपली. आज शुभम बेंगलोर येथे नोकरी करत असून, त्याने आपल्या आई-वडिलांना आनंदाचे क्षण देण्याचा संकल्प केला आहे.आई-वडिलांना विमानप्रवास घडविण्यापासून सुरू झालेल्या या आनंदयात्रेत शुभम आणि त्याच्या पत्नीने धार्मिक पर्यटनाची सुंदर भेट दिली. तिरुपती बालाजीच्या दर्शनासह अनेक पवित्र धार्मिक स्थळांचे दर्शन घडवून आई-वडिलांच्या आयुष्यात अविस्मरणीय आठवणींची भर घातली.
मुलांच्या यशापेक्षा आई-वडिलांच्या चेहऱ्यावरील समाधान मोठे!
आई-वडील मुलांना मोठे करण्यासाठी आयुष्यभर कष्ट करतात. त्यांच्या त्यागाची परतफेड कधीच होऊ शकत नाही. मात्र, त्यांच्या इच्छा पूर्ण करून त्यांना आनंदाचे क्षण देता येतात. शुभम थोरात आणि त्यांच्या पत्नीने घडविलेला विमानप्रवास, तिरुपती बालाजीचे दर्शन आणि कर्नाटकातील धार्मिक स्थळांची यात्रा ही त्याच कृतज्ञतेची जिवंत अनुभूती आहे.
या यात्रेदरम्यान तिरुमला येथील श्रीवारी पादालू, शिलाथोरणम, चक्रतीर्थ, वेणुगोपाळ मंदिर, आकाशगंगा आणि पापविनाशन अशा सहा ठिकाणांचे दर्शन घेतले. तसेच तिरुपती येथील पद्मावती मंदिर, गोविंदराजुलू मंदिर, कपिलतीर्थ मंदिर, कोदंडराम मंदिर आणि इस्कॉन मंदिर अशा पाच धार्मिक स्थळांनाही भेट दिली.यानंतर कर्नाटकातील धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांचाही प्रवास घडविण्यात आला. कणिवे बसवेश्वर मंदिर, भोग नंदीश्वर मंदिर, सर एम. विश्वेश्वरय्या संग्रहालय व समाधीस्थळ, रंगस्थळ येथील श्री रंगनाथ स्वामी मंदिर तसेच चिक्कबळ्ळापूर येथील ईशा फाउंडेशनमधील आदियोगी शिवमूर्ती अशा ठिकाणांना भेट देण्यात आली. याशिवाय आणखी काही ठिकाणांचे दर्शन घेण्याचे नियोजनही आहे.
आई-वडिलांच्या कष्टांची परतफेड पैशाने नव्हे, तर आनंदाने!
मुलगा किती मोठ्या पदावर पोहोचला, किती पैसा कमावला, यापेक्षा त्याने आपल्या आई-वडिलांना किती आनंद दिला, याला अधिक महत्त्व असते. शुभम थोरात आणि त्यांच्या पत्नीने आई-वडिलांसाठी केलेला हा प्रवास केवळ पर्यटन नसून त्यांच्या आयुष्यभराच्या कष्टांप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता आहे. आई-वडिलांच्या चेहऱ्यावरील समाधान, त्यांच्या डोळ्यांतील आनंद आणि एकत्र घालवलेले क्षण हीच या मुला-सुनेसाठी सर्वांत मोठी कमाई ठरली आहे.आजच्या धावपळीच्या जीवनात आई-वडिलांसाठी वेळ काढणेही अनेकांना कठीण जाते. अशा परिस्थितीत शुभम आणि त्यांच्या पत्नीने आई-वडिलांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी घेतलेला पुढाकार समाजासमोर एक सुंदर आदर्श निर्माण करणारा आहे. खऱ्या अर्थाने मुलाने आणि सुनेने आई-वडिलांच्या आयुष्यात आनंदाची तीर्थयात्राच घडवून आणली आहे!



