शहापूरच्या सुपुत्राची जपानमध्ये निवड; उद्या मान्यवरांच्या उपस्थितीत साहिल दुधाट यांचा सन्मान!

शहापूरच्या सुपुत्राची जपानमध्ये निवड; उद्या मान्यवरांच्या उपस्थितीत साहिल दुधाट यांचा सन्मान!

शहापूरच्या सुपुत्राची जपानमध्ये निवड; उद्या मान्यवरांच्या उपस्थितीत साहिल दुधाट यांचा सन्मान!
कोपरगाव । प्रतिनिधी । कोपरगाव तालुक्यातील शहापूर येथील साहिल दत्तात्रय दुधाट यांनी आपल्या जिद्द, मेहनत आणि शैक्षणिक गुणवत्तेच्या जोरावर थेट जपानमध्ये भरारी घेतली आहे. जपानमधील नामांकित Open Up Construction या कंपनीमध्ये त्यांची नोकरीसाठी निवड झाली असून, त्यांच्या या यशामुळे शहापूर गावासह संपूर्ण परिसराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.साहिल दुधाट यांनी आपले प्राथमिक शिक्षण जिल्हा प्राथमिक शाळा, शहापूर येथे पूर्ण केले. त्यानंतर इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण श्री. ग. र. औताडे विद्यालय, पोहेगाव येथे घेतले. अकरावी व बारावीचे शिक्षण के. बी. रोहमारे महाविद्यालय, जवळके येथे पूर्ण केल्यानंतर त्यांनी संजीवनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोपरगाव येथून स्थापत्य अभियांत्रिकी (बी.टेक. सिव्हिल इंजिनिअरिंग) ही पदवी संपादन केली.

अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या गुणवत्तेच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळवली. जपानमधील Open Up Construction या कंपनीमध्ये त्यांची निवड झाली असून, त्यांना भारतातील वार्षिक वेतन १८ लाख रुपये (१८ LPA) आणि जपानमधील वार्षिक वेतन २७ लाख जपानी येन असे वेतनविषयक पॅकेज आहे.ग्रामीण भागातून शिक्षण घेत आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःची ओळख निर्माण करणारे साहिल यांचे यश ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. त्यांच्या या यशामुळे दुधाट कुटुंबीयांसह नातेवाईक, मित्रपरिवार, शिक्षक आणि ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या यशाबद्दल साहिल दुधाट यांचा रविवार, दि. २९ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजता शहापूर येथील मारुती मंदिर परिसरात संत महंत ज्ञानेश्वरदास महाराज यांच्या शुभहस्ते सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून निवृत्त न्यायाधीश सोपानराव गव्हाणे, शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन भानुदास औताडे, भाजप तालुकाध्यक्ष कैलास रावण रहाणे, प्रविण जगन्नाथ शिंदे आणि जलसंपदा विभागाचे उपअभियंता एस. के. थोरात उपस्थित राहणार आहेत.साहिल दुधाट यांनी मिळवलेले हे यश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही मोठी स्वप्ने पाहून जागतिक स्तरावर आपले कर्तृत्व सिद्ध करावे, असा सकारात्मक संदेश देणारे ठरले आहे.



