चारा टंचाईच्या प्रश्नाला राजेश परजणे यांचा आवाज; पत्राची दखल घेत राहुरी विद्यापीठ १०० एकरांवर पिकविणार चारा!

चारा टंचाईच्या प्रश्नाला राजेश परजणे यांचा आवाज; पत्राची दखल घेत राहुरी विद्यापीठ १०० एकरांवर पिकविणार चारा!

चारा टंचाईच्या प्रश्नाला राजेश परजणे यांचा आवाज; पत्राची दखल घेत राहुरी विद्यापीठ १०० एकरांवर पिकविणार चारा!
कोपरगांव । प्रतिनिधी । अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागामध्ये पावसाचे प्रमाण अतियश कमी झाल्याने खरीप पिकांबरोबरच जनावरांसाठी आवश्यक असलेल्या चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण झालेली आहे. ही गंभिर परिस्थिती विचारात घेऊन राहुरी कृषी विद्यापीठाने चारा उत्पादीत करुन तो शेतकऱ्यांना अल्प दरात उपलब्ध करुन देण्यासंदर्भात गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांनी पत्राद्वारे केलेल्या मागणीची दखल घेऊन राहुरी कृषी विद्यापीठाने सुमारे १०० एकर क्षेत्रावर ज्वारीचा चारा उत्पादीत करण्याचा निर्णय घेतल्याने शेतकरी वर्गामधून समाधान व्यक्त केले जात आहे.अहिल्यानगरचे पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना दि. ३ ऑक्टोंबर २०२६ रोजी श्री परजणे यांनी पत्र पाठवून यावर्षी कमी पर्जन्यमानामुळे उद्भवलेल्या चारा टंचाईची परिस्थिती निदर्शनास आणून दिली. शेतीबरोबरच दुग्ध व्यवसाय हा शेतकऱ्यांसाठी आधार बनलेला असताना पाण्याअभावी चाऱ्याची उपलब्धता कमी झालेली आहे. त्यातच हिरवा व कोरडा चारा व पशुखाद्याच्या वाढत्या खर्चामुळे पशुपालक शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. चाऱ्याअभावी जनावरांचे संगोपन करणे कठीण झालेले आहे. याचा थेट परिणाम दूध उत्पादनावर व शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होत आहे. सद्या वीज, डिझेल, पेट्रोलसह पॉलिथीन, कोरोगेटेड बॉक्स व दूध प्रक्रियेसाठी लागणाऱ्या वस्तुंच्या किमती मोठ्या प्रमाणांवर वाढलेल्या आहेत. त्यामुळे दुधावर प्रक्रिया करणारे संघ अडचणीत सापडले आहेत. दुभत्या जनावरांचे पालन पोषण करणे शेतकऱ्यांना अवघड झालेले आहे. बाजारपेठेत ग्राहकांनाही दरवाढीचा फटका बसत आहे. हा सगळा विचार करता शासनाने चाऱ्याची निर्मिती करुन तो शेतकऱ्यांना तातडीने उपलब्ध करुन देण्याची गरज असल्याची श्री परजणे यांनी पत्रातून मागणी केली होती.राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडे कृषी व पशुसंवर्धन क्षेत्रातील तांत्रिक ज्ञान, मनुष्यबळ व उपलब्ध संसाधनांच्या माध्यमातून विद्यापीठाच्या क्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर चारा पिकवून तो चारा तसेच काही चाऱ्यापासून मुरघास निर्मिती करुन शेतकरी व पशुपालकांना अनुदानित अथवा सवलतीच्या दरात उपलब्ध करुन दिल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल असेही श्री परजणे यांनी पत्रातून निदर्शनास आणून दिले होते. पालकमंत्री ना. विखे पाटील यांनी यासंदर्भात जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांची टंचाई व नैसर्गीक आपत्ती बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केली होती. अलनिनोच्या आपत्तीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीबरोबरच श्री परजणे यांच्या चारा उपलब्ध करुन देण्याच्या मागणीवर बैठकीत चर्चा झाली. त्या अनुषंगाने राहुरी कृषी विद्यापीठाच्या मध्यवर्ती क्षेत्रावर हिरवा चारा उत्पादन कार्यक्रम राबविण्याबाबत चर्चा होऊन सुमारे १०० एकर क्षेत्रावर ज्वारीचा हिरवा चारा उत्पादन करण्याचे नियोजन करण्यात आले असून श्री राजेश परजणे यांना विद्यापीठाच्या बियाणे विभागाकडून (जा. क्र. प्रशा/ वि. वि. / चारा / २९७० / २०२६. दि. १८/११/२०२६) पत्र पाठवून कळविण्यात आले आहे. पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे विद्यापीठाने चारा उपलब्ध करुन देण्याचा व जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये तो वितरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचे जिल्ह्यातील शेतकरी वर्गाकडून स्वागत होत आहे



