आ. आशुतोष काळेंच्या जिद्दीने अखेर कित्येक दशकांची प्रतीक्षा संपवली

आ. आशुतोष काळेंच्या जिद्दीने अखेर कित्येक दशकांची प्रतीक्षा संपवली

चार गावांच्या शिवारात पोहोचले निळवंडेचे पाणी
कोपरगांव । प्रतिनिधी । कोरड्या शिवारात हिरवाई फुलविण्याचे स्वप्न उराशी बाळगून अनेक वर्षे निळवंडेच्या पाण्याकडे डोळे लावून बसलेल्या जवळके, धोंडेवाडी, बहादराबाद व शहापूर येथील शेतकऱ्यांची प्रतीक्षा अखेर संपली. आमदार आशुतोष काळे यांच्या भगीरथ प्रयत्नांतून बुधवार (दि.२५) रोजी निळवंडे कालव्याचे पाणी या चार गावांच्या लाभक्षेत्रात दाखल झाले. वितरिका क्रमांक ४ वरील बसविण्यात आलेला व्हॉल्व्ह शेतकऱ्यांनी स्वतःच्या हाताने फिरविला आणि कित्येक दशकांपासून पाहिलेले पाण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले. शिवारात पाणी पोहोचताच शेतकऱ्यांनी आ.आशुतोष काळे यांचा जयजयकार करीत जल्लोष केला. हा क्षण केवळ पाणी मिळाल्याचा नव्हता, तर अनेक वर्षांच्या प्रतीक्षेला मिळालेल्या यशाचा आणि आशेचा होता.

निळवंडे कालव्याचे पाणी जवळके, धोंडेवाडी, बहादराबाद व शहापूर येथील बंधारे आणि पाझर तलावांपर्यंत पोहोचविण्यासाठी वितरिका क्रमांक ४ वरील व्हॉल्व्हची पाईपलाईन एका शेतकऱ्याच्या डाळिंबाच्या बागेतून टाकणे बाकी होते. त्यामुळे पाणी पोहोचण्याचा मार्ग अडला होता. मात्र, शेतकऱ्यांची पाण्यासाठीची तळमळ आणि दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन आमदार आशुतोष काळे यांनी या अडचणीत यशस्वी मध्यस्थी केली. संबंधित शेतकऱ्याची समजूत काढून पाईपलाईनच्या कामातील अडथळा दूर केला. उर्वरित काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देत त्यांनी प्रशासनाकडून कामाला गती दिली. त्यांच्या या समयसूचक भूमिकेमुळे अनेक दिवसांपासून रखडलेले काम अपेक्षित वेळेत पूर्ण झाले आणि चार गावांच्या शिवारात पाणी पोहोचण्याचा मार्ग मोकळा झाला.काम पूर्ण होताच शेतकऱ्यांनी स्वतः पुढाकार घेत व्हॉल्व्ह फिरविला. पाण्याची पहिली धार कालव्यातून पुढे सरकली आणि अवघ्या तासाभरात पाणी लाभक्षेत्रात पोहोचले. पाण्याचा प्रवाह पाहताना शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद, डोळ्यांत दिसणारे समाधान आणि अनेक वर्षांची प्रतीक्षा संपल्याची भावना वातावरणात भरून राहिली. ज्या शिवाराने वर्षानुवर्षे पावसाची अनिश्चितता आणि पाण्याची टंचाई अनुभवली, त्याच शिवारात आता निळवंडेचे पाणी खळाळणार होते. जणू कोरड्या जमिनीच्या ओठांवर पाण्याच्या रूपाने समाधानाचे हसू उमटले होते.

चालू वर्षीच्या भीषण दुष्काळाने या भागातील शेतकरी आणि ग्रामस्थांची अवस्था अधिकच बिकट केली आहे. पावसाळ्यातील काही अपवादात्मक महिने वगळता टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागणाऱ्या या जिरायती भागात निळवंडेचे पाणी पोहोचणे म्हणजे दुष्काळाच्या काळोखात आशेचा किरणच ठरला आहे. हे पाणी केवळ बंधारे आणि पाझर तलाव भरणार नाही, तर भूगर्भातील पाणीपातळी वाढविण्यासोबतच शेतीला नवे बळ आणि शेतकऱ्यांच्या जगण्याला नवी उमेद देणार आहे. त्यामुळे उपस्थित शेतकऱ्यांनी आ.आशुतोष काळे यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करीत, दिलेला शब्द त्यांनी कृतीतून पूर्ण केल्याची भावना व्यक्त केली. अनेक वर्षांपासूनची पाण्याची प्रतीक्षा संपवून शिवारात पाणी आणणाऱ्या या प्रयत्नांमुळे चारही गावांतील शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस आनंद आणि समाधानाचा ठरला.
तहानलेल्या शिवारात निळवंडेचे पाणी पोहोचले, कष्टांचे चीज झाले
लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी स्वतः व्हॉल्व्ह फिरवून निळवंडेचे पाणी आपल्या शिवारात सोडले, हा माझ्या आयुष्यातील अत्यंत आनंदाचा आणि समाधानाचा क्षण आहे. हे पाणी लाभक्षेत्रातील प्रत्येक गावापर्यंत पोहोचावे, यासाठी भर उन्हात कालव्याच्या भरावावर पाटकऱ्याप्रमाणे बसून काम पूर्ण होईपर्यंत ठाण मांडून राहिलो. अनेक अडचणी आल्या, पण प्रत्येक अडचणीवर मार्ग काढला. आज शेतकऱ्यांच्या शिवारात पाणी वाहताना पाहून त्यासाठी घेतलेल्या कष्टांचे खऱ्या अर्थाने चीज झाल्याचे समाधान आहे. शेतकऱ्यांच्या शिवारात पाणी दिसावे, त्यांची तहानलेली शेती हिरवीगार व्हावी आणि त्यांच्या कुटुंबात समृद्धी यावी, हेच माझे स्वप्न होते. आज त्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर फुललेला आनंद आणि त्यांच्या मनातील समाधान हीच माझ्या कामाची सर्वात मोठी पावती आहे.-आ.आशुतोष काळे.



