ब्रेकिंग

नैसर्गिक प्रसूतीबाबत जनजागृतीसाठी अहिल्यानगरमध्ये भव्य रॅली; ३४० नर्सिंग विद्यार्थी व प्राध्यापकांचा सहभाग

नैसर्गिक प्रसूतीबाबत जनजागृतीसाठी अहिल्यानगरमध्ये भव्य रॅली; ३४० नर्सिंग विद्यार्थी व प्राध्यापकांचा सहभाग

नैसर्गिक प्रसूतीबाबत जनजागृतीसाठी अहिल्यानगरमध्ये भव्य रॅली; ३४० नर्सिंग विद्यार्थी व प्राध्यापकांचा सहभाग

अहिल्यानगर । प्रतिनिधी । मातृत्व हा स्त्रीच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील टप्पा असतो. या काळात आईचे आरोग्य, बाळाची सुरक्षितता आणि सन्मानपूर्वक मातृत्व काळजी यांना सर्वोच्च प्राधान्य मिळणे आवश्यक आहे. मात्र, अलीकडच्या काळात सिझेरियन प्रसूतींचे वाढते प्रमाण हा आरोग्य क्षेत्रातील चिंतेचा विषय बनला आहे. या पार्श्वभूमीवर नैसर्गिक प्रसूतीबाबत जनजागृती करण्यासाठी आणि सुरक्षित मातृत्वाचा संदेश समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने अहिल्यानगरमध्ये भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत ३४० नर्सिंग विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

‘सोसायटी ऑफ मिडवाईफ इंडिया’ (SOMI) यांच्या वतीने नैसर्गिक प्रसूती पद्धतीचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी देशभरात राष्ट्रव्यापी वॉकथॉन आणि जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी रविवार, दि. २२ नोव्हेंबर २०२६ रोजी डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनचे कॉलेज ऑफ नर्सिंग आणि रोटरी क्लब ऑफ अहिल्यानगर सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने या रॅलीचे आयोजन करण्यात आले.रॅलीला सकाळी ९.१५ वाजता डॉ. विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रापासून सुरुवात झाली. शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करत रॅलीचा समारोप प्रोफेसर चौक येथे करण्यात आला.सिझेरियन प्रसूती ही काही प्रसंगी आई आणि बाळाचे प्राण वाचविणारी अत्यावश्यक वैद्यकीय प्रक्रिया असते. मात्र, वैद्यकीयदृष्ट्या आवश्यकता नसताना केवळ पर्याय म्हणून सिझेरियन प्रसूतीचा अवलंब होऊ नये, हा या जनजागृती मोहिमेचा प्रमुख संदेश होता. प्रत्येक गर्भवती महिलेला तिच्या आरोग्यस्थितीनुसार योग्य वैद्यकीय सल्ला, नैसर्गिक प्रसूतीसाठी आवश्यक मार्गदर्शन, भावनिक आधार आणि सन्मानपूर्वक मातृत्व काळजी मिळाली पाहिजे. नैसर्गिक प्रसूतीला प्रोत्साहन देतानाच माता आणि बाळाची सुरक्षितता सर्वोच्च ठेवणे, प्रसूतीविषयक निर्णयांमध्ये महिलेच्या मताचा आणि सन्मानाचा आदर करणे तसेच आवश्यकतेनुसार योग्य वैद्यकीय हस्तक्षेप स्वीकारणे, ही या मोहिमेची प्रमुख भूमिका होती.या रॅलीमध्ये नर्सिंग महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि प्राध्यापक असे एकूण ३४० जण सहभागी झाले होते. हातात जनजागृतीपर फलक घेऊन आणि घोषणा देत विद्यार्थ्यांनी नागरिकांमध्ये नैसर्गिक प्रसूतीचे महत्त्व पटवून दिले. आरोग्य क्षेत्रातील व्यक्तींसह समाजातील सर्व घटकांनी या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.याप्रसंगी स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र संघटनेच्या अहिल्यानगर शाखेच्या सचिव डॉ. नीलम बागल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, “सुदृढ मातृत्व आणि नैसर्गिक प्रसूतीची तयारी ही केवळ गर्भधारणेनंतर सुरू होणारी प्रक्रिया नसून मुलींच्या किशोरवयापासूनच त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. यासाठी मुली आणि महिलांनी दैनंदिन आहारात कॅल्शियम व लोहयुक्त पदार्थांचा पुरेसा समावेश करणे गरजेचे आहे.”

या सामाजिक उपक्रमासाठी संस्थेचे वैद्यकीय संचालक प्रा. डॉ. अभिजित दिवटे यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. रोटरी क्लब ऑफ अहिल्यानगर सेंट्रलचे अध्यक्ष श्री. अमर गुरव यांनी विशेष उपस्थिती दर्शवून उपक्रमाला पाठिंबा दिला.संपूर्ण कार्यक्रम महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रतिभा ए. चांदेकर आणि उपप्राचार्या डॉ. योगिता औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्रीमती नीलिमा जगताप, श्रीमती रेबेका साळवे आणि कु. नम्रता शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले. सकाळी १०.१५ वाजता रॅलीचा उत्साहात समारोप झाला.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!