ब्रेकिंग

नाट्यगृहाच्या लोकार्पणावरून राजकारण नको; योगदान नसलेल्यांनी श्रेय घेऊ नये – दिपाली पांचारिया

नाट्यगृहाच्या लोकार्पणावरून राजकारण नको; योगदान नसलेल्यांनी श्रेय घेऊ नये – दिपाली पांचारिया

मुख्याधिकाऱ्यांवर राजकीय दबाव टाकून प्रसिद्धीपत्रक काढल्याचा आरोप; विरोधकांच्या भूमिकेवर गटनेत्या पांचारिया यांची टीका

संगमनेर । प्रतिनिधी । संगमनेर शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारे अत्याधुनिक कवी अनंत फंदी नाट्यगृह उभारण्यासाठी २०११ पासून अनेकांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे यांच्यासह अनेकांच्या पाठपुराव्यातून हे नाट्यगृह साकारले आहे. मात्र, नाट्यगृहाचे लोकार्पण झाल्यानंतर त्याच्या श्रेयावरून राजकीय वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप संगमनेर सेवा समितीच्या गटनेत्या सौ. दिपाली पांचारिया यांनी केला आहे.यंदा राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने नाट्यगृहाचा लोकार्पण सोहळा अत्यंत साध्या पद्धतीने आयोजित करण्यात आला. त्याचबरोबर दुष्काळग्रस्तांना मदत करण्याच्या उद्देशाने दोन नाट्यप्रयोगांचे आयोजन करण्यात आले असून त्यातून जमा होणारी ३ लाख ३३ हजार ३३३ रुपयांची रक्कम दुष्काळ निधीसाठी देण्यात येणार आहे. अशा सामाजिक भावनेतून कार्यक्रमाचे आयोजन झाले असताना काही लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या समर्थकांकडून श्रेयवादाचे राजकारण केले जात असल्याची टीका पांचारिया यांनी केली.कवी अनंत फंदी नाट्यगृह हे संगमनेर नगरपरिषदेच्या माध्यमातून उभारण्यात आलेले आधुनिक सुविधांनी सज्ज असे एक हजार आसनक्षमतेचे नाट्यगृह आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे संगमनेरमध्ये अद्ययावत नाट्यगृह आणि क्रीडा संकुल उभारण्याचे स्वप्न होते. २०११ मध्ये तत्कालीन नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे यांच्या कार्यकाळात बंदिस्त नाट्यगृहासाठी पाठपुरावा सुरू झाला. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शासकीय स्तरावर सातत्याने प्रयत्न करून या कामाला मदत केली. त्यानंतर आमदार सत्यजित तांबे यांनी नगरविकास विभाग, सांस्कृतिक विभाग आणि मराठी भाषा विभागाकडे पाठपुरावा केला. अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांच्या भेटी घडवून आणण्याबरोबरच मंत्री उदय सामंत यांचेही सहकार्य मिळाले. विविध विभागांच्या निधीतून हे नाट्यगृह साकारले आहे.पांचारिया म्हणाल्या की, नाट्यगृहाचे लोकार्पण दुष्काळी परिस्थितीचे भान ठेवून साध्या पद्धतीने करण्याची सर्व नगरसेवक व नगरसेविकांची भूमिका होती. त्यानुसार कार्यक्रम पार पडला. दोन नाट्यप्रयोगांच्या माध्यमातून दुष्काळग्रस्तांसाठी निधी उभारण्याचा निर्णयही घेण्यात आला. मात्र, नाट्यगृहाच्या कामात कोणतेही योगदान नसलेल्या लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या समर्थकांनी राजकीय दबाव टाकून नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडून प्रसिद्धीपत्रक काढून घेतल्याचा आमचा आरोप आहे. विकासकामांचे श्रेय घेण्यापेक्षा शहराच्या विकासासाठी योगदान देणे महत्त्वाचे आहे.नाट्यगृहाचे लोकार्पण पूर्ण झाले असून तेथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सुरू झाले आहेत. कवी अनंत फंदी व्याख्यानमालेचाही प्रारंभ होत आहे. या नाट्यगृहाचा जिल्हा आणि राज्यात गौरव होत असताना त्यावरून राजकारण करणे योग्य नाही. फ्लेक्सबाजी करून श्रेय घेण्यापेक्षा विकासकामांमध्ये प्रत्यक्ष सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी केले.दरम्यान, संगमनेर नगरपरिषदेच्या विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना निमंत्रित करण्यात आले आहे. नगरपरिषदेच्या शिष्टमंडळाने यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली असून त्यांच्या वेळेनुसार उद्घाटनाची तारीख निश्चित होणार असल्याचेही पांचारिया यांनी सांगितले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!