ओझर – रहिमपूर परिसरात कृषिदूतांचा पुढाकार; जनावरांचे लाळ्या खुरकूत प्रतिबंधक लसीकरण

ओझर – रहिमपूर परिसरात कृषिदूतांचा पुढाकार; जनावरांचे लाळ्या खुरकूत प्रतिबंधक लसीकरण

कृषिदूत व पशुसंवर्धन विभागाच्या संयुक्त विद्यमाने लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक लसीकरण मोहीम
संगमनेर । प्रतिनिधी । महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय, अमृतनगर येथील कृषिदूतांनी पशुसंवर्धन विभागाच्या सहकार्याने ओझर-रहिमपूर परिसरात जनावरांसाठी लाळ्या खुरकूत (FMD) रोग प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबवली. या उपक्रमांतर्गत परिसरातील पशुधनाचे लसीकरण करून पशुपालकांना लाळ्या खुरकूत रोगाची लक्षणे, प्रसार, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि नियमित लसीकरणाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.या मोहिमेसाठी पशुधन विकास अधिकारी डॉ. शैलेश बन व व्रणोपचारक श्री. कैलास कांबळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जनावरांचे लसीकरण करण्यात आले. तसेच पशुपालकांना जनावरांचे आरोग्य जपणे, वेळेवर लसीकरण करणे आणि रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेणे याबाबत माहिती देण्यात आली.

यावेळी पशुधन विकास अधिकारी डॉ. शैलेश बन यांनी पशुपालकांना जनावरांच्या आहार व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन केले. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध चाऱ्याचा योग्य वापर करून कमी दर्जाचा चारा सकस व पौष्टिक कसा बनवावा, याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. तसेच चाऱ्यावर योग्य प्रक्रिया करून त्याची पोषणमूल्ये कशी वाढवावीत, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक पशुपालकांना करून दाखविले. दुष्काळी परिस्थितीत चाऱ्याची उपलब्धता कमी असताना उपलब्ध चाऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे, जनावरांना सकस व संतुलित आहार देणे आणि त्याद्वारे दूध उत्पादन व पशुधनाचे आरोग्य टिकवून ठेवणे किती महत्त्वाचे आहे, हे त्यांनी स्पष्ट केले.या मोहिमेत कृषिदूत अक्षय पालवे, पार्थ पानसरे, श्रेयस राऊत, वैभव सातपुते, ऋतुराज शिंदे, श्रेयश सोंडकर व रुद्राक्ष गाढवे यांनी सक्रिय सहभाग घेतला.



