दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर टंचाई आढावा बैठकीत आ.आशुतोष काळेंनी मांडल्या महत्त्वपूर्ण मागण्या

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर टंचाई आढावा बैठकीत आ.आशुतोष काळेंनी मांडल्या महत्त्वपूर्ण मागण्या

१९ हजार ७११ शेतकऱ्यांची अग्रीम मदत प्रलंबित; आ.आशुतोष काळेंनी वेधले पालकमंत्र्यांचे लक्ष
कोपरगांव । प्रतिनिधी । कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेऊन नागरिकांना पिण्याचे पाणी आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी विविध उपाययोजनांचा आग्रह धरला आहे. पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार (दि.२८) रोजी पार पडलेल्या ऑनलाइन टंचाई आढावा बैठकीत आ.आशुतोष काळे यांनी अनेक महत्त्वपूर्ण मागण्या मांडून त्यावर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली त्या मागण्यांना पालकमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.यामध्ये गोदावरी उजवा व डावा कालवा, पालखेड कालवा आणि निळवंडे कालव्याचे सुरू असलेले आवर्तन पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्याची आग्रही मागणी त्यांनी केली. कालव्यांच्या आवर्तनातून गावातील तलाव, बंधारे तसेच पाणीपुरवठा योजनांशी संबंधित जलस्रोत पूर्ण क्षमतेने भरल्याशिवाय आवर्तन बंद करू नये असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत, अशी मागणी त्यांनी मांडली. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या अग्रीम मदतीच्या वितरणातील प्रलंबित प्रश्नाकडेही आ.आशुतोष काळे यांनी लक्ष वेधले. प्रतिशेतकरी पाच हजार रुपयांच्या अग्रीम मदतीसाठी करण्यात आलेल्या पंचनाम्यांनुसार मतदारसंघातील ६१ हजार ३९२ शेतकरी पात्र ठरले आहेत. त्यापैकी ४१ हजार ६८१ शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत जमा झाली असून, अद्याप १९ हजार ७११ शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. आर्थिक अडचणीत असलेल्या या शेतकऱ्यांना उर्वरित मदतीची रक्कम तातडीने वितरित करण्याचे निर्देश महसूल व कृषी विभागाला द्यावेत, अशी मागणी केली.

जलजीवन मिशनअंतर्गत २२ गावांतील पाणीपुरवठा योजनांच्या वीज जोडणीचे प्रस्ताव पंचायत समिती व महावितरण विभागाकडे प्रलंबित असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. या प्रस्तावांना तातडीने मंजुरी देऊन प्रत्यक्ष वीज जोडणी पूर्ण केल्यास संबंधित गावांतील पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी दिलासा मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले.तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत जलजीवन मिशनच्या अपूर्ण पाणीपुरवठा योजना तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्यासाठी टंचाई आराखड्यातून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली. सुरेगाव येथे ६०० मीटर पाइपलाइन व तळ्यात कागद टाकणे, धारणगाव येथे रोड क्रॉसिंगसाठी १०० मीटर पाइपलाइन, पिचिंग व तळ्यात कागद टाकणे, तसेच पुणतांबा येथे ४०० मीटर पाइपलाइन टाकण्याची कामे पूर्ण झाल्यास या गावांच्या पाणीपुरवठा योजना तात्पुरत्या स्वरूपात सुरू करता येणे शक्य आहे. त्यामुळे या कामांना टंचाई आराखड्यातून तातडीने निधी मंजूर करावा, अशी मागणी त्यांनी केली.दुष्काळी परिस्थितीत पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि रखडलेल्या पाणीपुरवठा योजनांची पूर्तता या तिन्ही बाबींना प्राधान्य देऊन प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी अशा अनेक मागण्या आ.आशुतोष काळे यांनी या बैठकीत पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहेत.



