सोमैया महाविद्यालयात ‘गोदातरंग’च्या ‘विकसित भारत’ विशेषांकाचे प्रकाशन

सोमैया महाविद्यालयात ‘गोदातरंग’च्या ‘विकसित भारत’ विशेषांकाचे प्रकाशन


सोमैया महाविद्यालयात ‘गोदातरंग’च्या ‘विकसित भारत’ विशेषांकाचे प्रकाशन
कोपरगाव । प्रतिनिधी । “विकसित भारत म्हणजे केवळ डिजिटाईज इंडिया नव्हे, तर येथील शेतकरी-शेतमजुरापासून ते थेट उच्चवर्गीय समाजापर्यंत प्रत्येक माणूस विकसित होणे अपेक्षित आहे, हा विचार लक्षात घेऊन सोमैया महाविद्यालयाने आजच्या व्हाट्सअप युनिव्हर्सिटीवर सक्रिय असलेल्या युवा वर्गाला ललित लेखन करण्यास प्रेरित करणे आणि त्यासाठी ‘गोदातरंग’ सारखे उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे नक्कीच भूषणावह आहे. त्यामुळे या अंकासाठी लेखन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे व संपादक मंडळ आदी घटकांचे मनापासून कौतुक करतो,” असे विचार कोपरगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी मा. अजित निकत यांनी व्यक्त केले. स्थानिक के. जे. सोमैया वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने आयोजित ‘गोदातरंग’ ‘विकसित भारत विशेषांक’ प्रकाशन समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी विश्वस्त संदीप रोहमारे व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अॅड राहुल रोहमारे यांची विशेष उपस्थिती होती.

मा. निकत पुढे म्हणाले की, “आपल्या देशाला खरोखरच ‘विकसित भारत’ बनवायचे असेल तर स्वच्छतेचा विचार समजावून घेऊन तो काटेकोरपणे अमलात आणणे गरजेचे आहे. अन्यथा अलीकडे घरातील कचरा रस्त्यावर टाकून गाव, समाज व देशाला अस्वच्छ केले जाते आहे. आपणच अस्वच्छता निर्माण करायची व आपणच स्वच्छता करायची हे बरोबर नाही. आज जिकडे-तिकडे प्लास्टिकच्या कचऱ्याचा बोलबाला आहे. घरा-दारात, शाळेत, शेतात सगळीकडे तेच दिसते.विद्यार्थ्यांनी हे बदलले पाहिजे.” सोमैया सारख्या ग्रामीण महाविद्यालयात एआय-एमएल आणि रोबोटिक लॅब ची सुविधा उपलब्ध आहे, त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा.”अध्यक्षस्थानावरून बोलताना मा. संदीप रोहमारे म्हणाले की, “विद्यार्थ्यांनी विकसित भारत आणि पर्यावरण-रक्षणाचा संकल्प करून त्याची सुरुवात आपल्या घरातूनच केली पाहिजे. पर्यावरणाची काळजी न घेतल्यास जन्माला येणारी पुढील पिढी कॅन्सर घेऊनच जन्माला येईल, हे विसरू नका. ‘गोदातरंग’ अंकात लेखन सहभाग तसेच अभ्यासेतर उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांचे मी अभिनंदन करतो.”उपस्थितांचे स्वागत करताना प्राचार्य डॉ. विजय ठाणगे म्हणाले की, “भारताचे पूर्व राष्ट्रपती भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीदिनी या अंकाचे प्रकाशन होणे हा एक दुग्धशर्करा योग आहे. ‘गोदातरंग’ अंकाला फार मोठी परंपरा आहे. गेल्या ६० वर्षांपासून सातत्याने ‘गोदातरंग’ चे प्रकाशन होते आहे. आतापर्यंत आमच्या महाविद्यालयाने ‘स्त्रीभ्रूण हत्या’, ‘माझा गाव माझे शिवार’, ‘संत साहित्य’ के. बी. रोहमारे जन्मशताब्दी’,’कोरोना महामारी’, ‘महिला सुरक्षा’, ‘शेती आणि शेतकरी’ ‘जागतिक तापमान वाढ’ ‘हवामान बदल’ आधी अनेक विशेषांक काढले आहेत आणि त्यांना अनेक पारितोषिके देखील प्राप्त झाले आहेत ही संस्था व महाविद्यालयासाठी अभिमानाची बाब आहे.

मागील शैक्षणिक वर्षात महाविद्यालयात झालेल्या ‘कटिंग एज रिसर्च’, ‘सुंदर माझी शाळा’, भि. ग. रोहमारे राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य पुरस्कार वितरण आदी अनेक विद्यार्थी व समाजोपयोगी उपक्रमांचे प्रतिबिंब या अंकात उमटले आहे.”संस्थाध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे, सचिव अॅड संजीव कुलकर्णी यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी वाचन प्रेरणा दिनानिमित्त माजी राष्ट्रपती स्व. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्मृतींना अभिवादन करून त्यांच्या योगदानावर प्रकाशझ्योत टाकण्यात आला. ‘गोदातरंग’ अंकाच्या संपादक मंडळाचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच मराठी विभागाचे डॉ. विठ्ठल लंगोटे यांच्या तीन ग्रंथांचे प्रकाशन देखील करण्यात आले.’गोदातरंग’ वार्षिकांकाचे मुख्य संपादक डॉ. जिभाऊ मोरे यांनी प्रास्ताविक व प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला तर ग्रंथपाल डॉ. नीता शिंदे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. प्रा. वर्षा आहेर व प्रा. विनोद शिनगारे यांनी सूत्रसंचालन केले.या कार्यक्रमाला कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. बाळासाहेब सोनवणे, रजिस्ट्रार डॉ. अभिजीत नाईकवाडे, डॉ. बापूसाहेब भोसले, डॉ. संतोष पगारे, डॉ. रवींद्र जाधव तसेच प्राध्यापक वृंद व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



