ब्रेकिंग

चारा छावण्यांबाबत लवकर निर्णय व्हावा – मा.महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

सरकारने शेतकऱ्यांसोबत शेतमजुरांच्या पाठीशी ही उभे राहावे

चारा छावण्यांबाबत लवकर निर्णय व्हावा – मा.महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

सरकारने शेतकऱ्यांसोबत शेतमजुरांच्या पाठीशी ही उभे राहावे
संगमनेर । प्रतिनिधी । शेजारील कर्नाटक राज्यात दुष्काळामुळे चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही शासनाने तातडीने निर्णय घेऊन चारा छावण्या सुरू कराव्यात तसेच इतर भागांमधून किंवा इतर राज्यांमधून चारा उपलब्ध करून द्यावा. राज्य सरकारने शेतकऱ्यांसोबतच शेतमजुरांच्या पाठीशी उभे राहावे अशी आग्रही मागणी काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा मा.महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

राज्यातील दुष्काळी परिस्थिती बाबत बोलताना काँग्रेस नेते मा.कृषी व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, राज्यामध्ये दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण होत असून पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. यंदा खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. सोयाबीन सारखी पिके शेतातून काढण्यासाठी चार ते पाच हजार रुपये खर्च येतो. परंतु शेतकऱ्यांच्या हातात काहीही उरले नाही. पाणी नसल्यामुळे रब्बी हंगाम हाती येण्याची शक्यता उरलेली नाही. येत्या काळात पिण्याच्या पाण्याची अत्यंत भीषण टंचाई जाणवणार आहे. त्याचबरोबर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न बिकट होणार असून विशेषता दुधाळ जनावरांचे संगोपन करणे शेतकऱ्यांसाठी कठीण काम झाले आहे.पिकेच नसल्यामुळे शेतात काम करणाऱ्या शेतमजुरांच्या हाताला काम उरलेले नाही. रोज कमावून रोज खाणाऱ्या शेतमजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. सरकारने शेतकऱ्यांबरोबरच शेतमजुरांसाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.शेजारील कर्नाटक राज्यात दुष्काळामुळे चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही शासनाने तातडीने निर्णय घेऊन चारा छावण्या सुरू कराव्यात तसेच इतर भागांमधून किंवा इतर राज्यांमधून चारा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी त्यांनी केली. दुष्काळाच्या सुरुवातीलाच आम्ही सरकारवर थेट आरोप करू इच्छित नाही परंतु सरकारने या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शेतकरी,शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे असे ते म्हणाले.आगामी दहा महिने अतिशय कठीण जाणार असून राज्यासमोर दुष्काळाचे मोठे संकट आहे. पाणी,चारा, पशुधन आणि शेतकरी शेतमजुरांच्या उपजीविकेचा प्रश्न गंभीर बनणार आहे. शेतकरी सध्या मोठ्या अडचणीत जात असून त्यांना वेळोवेळी पाठबळ देणे गरजेचे आहे. कर्जमाफीचे टप्पे केल्यामुळे व्याजाचा व बँकेचा नवा प्रश्न उभा राहिला असून यावर सरकारने तातडीने मार्ग काढावा अशी मागणी ही त्यांनी केली. साखर कारखानदारीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत झाली असून यावर्षी दुष्काळामुळे ऊसाची उपलब्धता कमी असणे, पावसाअभावी वजनामध्ये झालेली घट आणि कारखान्याची क्षमता वाढल्यामुळे चालू गळीत हंगाम 100  दिवस ही चालेल की नाही अशी भीती आहे. साखर कारखानदारी वाचवण्यासाठी सुद्धा सरकारने व सर्व संबंधित विभागांनी एकत्र येऊन तातडीने निर्णय घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!