आ. सत्यजित तांबे यांच्या सत्कारासाठी राज्यभरातून कार्यकर्त्यांची मोठी गर्दी


सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कारखाना कार्यस्थळावरील प्रेरणास्थळ येथे नवनिर्वाचित युवा आमदार सत्यजित तांबे यांनी स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांना अभिवादन केले. याप्रसंगी तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सत्यजित तांबे पहिल्याच फेरीत विक्रमी मताधिक्याने विजयी होणार याची खात्री सर्व कार्यकर्त्यांना होती. रात्री उशिरा निकाल आल्यानंतर संगमनेर मध्ये आनंद उत्सव साजरा झाला.
मात्र काल नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथील युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मानस पगार यांच्या दुःखद निधनामुळे सत्यजित तांबे यांनी आनंदोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला .त्यामुळे दिवसभर आमदार सत्यजित तांबे हे आपल्या प्रभा निवासस्थानी थांबून होते. तरीही अनेक तालुक्यांमधून कार्यकर्ते मोठ्या संख्येने डॉ. तांबे यांच्या निवासस्थानी दाखल झाले. यावेळी पदाधिकारी ,युवक, महिला, टीडीएफ संघटना, लोकभारती या शिक्षक संघटनांसह सुमारे 105 विविध संघटनांचे पदाधिकारी ही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी माध्यमांशी बोलताना सत्यजित तांबे म्हणाले की, हा विजय नाशिक विभागातील पदवीधर मतदारांचा आहे. आमदार डॉ सुधीर तांबे यांनी मागील बारा वर्षांमध्ये केलेले काम. त्यांनी केलेल्या सातत्याने संपर्क , विविध शाळांचे अनुदान, जुनी पेन्शन योजना, डॉक्टर, इंजिनिअर, निमशासकीय कर्मचारी, बेरोजगार या सर्वांच्या विविध प्रश्नांसाठी केलेला पाठपुरावा यातून जोडलेले जीवाभावाचे कार्यकर्ते .तसेच निर्माण झालेला मोठा जिव्हाळ्याचा मित्रपरिवार या सर्वांनी मोठा पाठिंबा दिला .सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांची शिकवण घेऊन आपण काम करत असून समाजकारणाचा वारसा यापुढील काळातही आपण जपणार आहोत. आ. डॉ तांबे यांनी केलेले सातत्याने काम आणि केलेली मतदार संघाची बांधणी याला मतदारांनी मोठी पसंती दिली असून हे सर्व श्रेय विविध पक्षातील कार्यकर्ते , पाठिंबा देणाऱ्या सर्व संघटना, त्यांचे पदाधिकारी व पदवीधर मतदारांचे असल्याचेही सत्यजित तांबे यांनी सांगितले.