स्व.गोपीनाथ मुंडे हे राजकारणापलीकडे मैत्री जपणारे नेते – माजी मंत्री बाळासाहेब थोरात
स्व.गोपीनाथ मुंडे हे राजकारणापलीकडे मैत्री जपणारे नेते – माजी मंत्री बाळासाहेब थोरात
संगमनेर ( प्रतिनिधी ) गोपीनाथ मुंडे यांनी आयुष्यभर बहुजनांच्या विकासासाठी लढा दिला. राज्यात उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री असे विविध पदे भूषवताना त्यांनी सर्वांना सोबत घेऊन काम केले. पक्ष विरहित मित्रत्वाचे नाते जपण्याचा त्यांचा स्वभाव गुण होता . आदर्श प्रशासक, लोकप्रतिनिधी असलेले स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे हे कायम राजकारणा पलीकडे जाऊन मैत्री जपणारे नेते होते असे प्रतिपादन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा मा. मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
यशोधन जनसंपर्क कार्यालय येथे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या 75 व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी समवेत मा.आ.डॉ सुधीर तांबे,डॉ.जयश्रीताई थोरात, गणपतराव सांगळे, विश्वासराव मुर्तडक, बी.आर.चकोर, राजेंद्र चकोर, सुभाष सांगळे, सौ.प्रमिलाताई अभंग, सोमेश्वर दिवटे, रोहिदास सानप,शेखर सोसे, बाळासाहेब गायकवाड,नितीन सांगळे,प्रा.बाबा खरात, नवनाथ नागरे, तुषार वनवे, भूषण सानप, प्रतीक सांगळे, श्रीराम कु-हे आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजीमंत्री थोरात म्हणाले की, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे हे एक आदर्श लोकप्रतिनिधी आदर्श प्रशासक आणि आदर्श मित्र होते. सर्वांसाठी आयुष्यभर झटणारा नेता असा त्यांचा आवर्जून उल्लेख होतो.अनेक दिवस एकत्र काम करण्याची संधी मिळाली.आमचे पक्ष जरी वेगळे असले तरी पक्ष मैत्री त्यांनी जपली.
स्वर्गीय विलासरावजी देशमुख आणि गोपीनाथराव मुंडे यांची मैत्री हि महाराष्ट्रासाठी आनंदाचे पर्व होते. मित्रत्वाचे नाते जपण्याचा त्यांचा स्वभाव होता. कोणताही भेदभाव न करता सर्वांना सोबत घेऊन जाणारे गोपीनाथराव मुंडे यांनी उपमुख्यमंत्री केंद्रीय मंत्री असे विविध पदे भूषवले. या सर्व काळात शेतकरी आणि सर्वसामान्य करता मोठी कामे त्यांनी केली. केंद्रीय मंत्री झाल्यानंतर खरंतर मोठे भविष्यकाळ त्यांना होता. परंतु त्यांच्या आपत्कालीन निधनाने महाराष्ट्रावर शोककळा पसरली त्यांचे योगदान महाराष्ट्राच्या कायम स्मरणात राहील असेही ते म्हणाले.तर मा.आ.डॉ.तांबे म्हणाले की, राजकारणा पलीकडे जाऊन लोकनेते बाळासाहेब थोरात व गोपीनाथराव मुंडे यांची मैत्री होती. पक्ष वेगळे असले तरी मैत्री जपणारे ते नेते होते. आणि ही महाराष्ट्राची संस्कृती राहिली आहे. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी बहुजन समाजाचे नेतृत्व करताना त्यांनी आयुष्यभर शेतकरी आणि बहुजनांसाठी लढा दिला. त्यांनी बहुजन समाजाच्या विकासासाठी केलेले काम हे नक्कीच मोठे असल्याचे ते म्हणाले. यावेळी संगमनेर तालुक्यातील काँग्रेस व विविध सेवाभावी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.