नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत द्या- आ. बाळासाहेब थोरात
काँग्रेस नेते आ. थोरात यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत द्या- आ. बाळासाहेब थोरात
संगमनेर । विनोद जवरे ।
वाढलेली महागाई, शेतमालाचे पडलेले भाव अशा कठीण परिस्थितीतून मोठी गुंतवणूक करत फुलवलेल्या शेतीचे अवकाळी पाऊस व गारपिटीने मोठे नुकसान झाले आहे. सरकारने फक्त घोषणा न करता नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने जास्तीत जास्त मदत द्यावी अशी आग्रही मागणी माजी कृषी व महसूलमंत्री काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
सावरचोळ, निमगाव खुर्द, निमगाव बु., पेमगिरी, नांदुरी दुमाला, मेंगाळवाडी या गावांमधील गारपीट व अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली. यावेळी समवेत कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे, जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे, अजय फटांगरे, संतोष हासे, सोमनाथ गोडसे, विलास कवडे, बाळासाहेब कानवडे, मारुती कवडे ,संदीप गोपाळे ,बाळकृष्ण गांडाळ, शिवाजी वलवे, प्रांताधिकारी डॉ.शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी अनिल नागणे ,कृषी अधिकारी प्रवीण गोसावी आदींसह विविध विभागाचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी आमदार थोरात यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यांना दिलासा दिला. याप्रसंगी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, शेतकरी हा मोठ्या आर्थिक संकटात असून वाढलेली महागाई, शेतमालाचे पडलेले बाजार भाव अशा मोठ्या अडचणीतूनही मोठी गुंतवणूक करत शेतकरी शेती फुलवतो. मात्र अवकाळी पाऊस गारपीट यामुळे उभी केलेली पिके जमीनदोस्त झाली आहेत. यातून राज्यभरात अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा संकटाच्या काळात सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे .राज्यात जिथे जिथे नुकसान झाले आहे. त्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून फक्त घोषणा न करता शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत दिली पाहिजे.
राम हे सर्वांचे श्रद्धास्थान असून राम हा माझ्या शेतकरी बांधवांमध्येच आहे. शेतकरी संकटात असताना देव आयोध्यात असेल कसा राहील तर तोसुद्धा या संकटात काळात इथे आला असेल . म्हणून
सरकारने वाढलेली महागाई, बेरोजगारी, शेतीमालाचे पडलेले बाजार भाव यावरून लक्ष वळवण्यासाठी धार्मिक मुद्दे पुढे करू नये .याऐवजी प्रत्यक्ष शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत केली पाहिजे आणि ती तातडीने मिळाली पाहिजे. अयोध्या दौऱ्यानंतर मुख्यमंत्री आणि त्यांचे सरकारमधील मंत्री हे शेतकऱ्यांच्या बांधावर गेले आहे. मात्र उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी मदतीची मोठी घोषणा करावी अशी मागणी ही काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. गारपीट व अवकाळी पावसाने या विविध गावांमध्ये टोमॅटो, डाळिंब घास, मका, गवत चारा यासह डाळिंब शेतीचे मोठे नुकसान झाले असून अनेक घरांचे पत्रे उडाले आहेत. या सर्व नुकसानग्रस्तांना आमदार बाळासाहेब थोरात व डॉ जयश्रीताई थोरात यांनी भेटी दिल्या असून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. व प्रशासनाला तातडीने पंचनामे करून जास्तीत जास्त मदतीच्या सूचना केल्या आहेत . आमदार थोरात यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला असून अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.