ब्रेकिंग

निळवंडे चे पाणी दुष्काळी भागात येणे हा आनंदाचा क्षण – आ.थोरात

लोहारे मिरपुर येथे मोठ्या आनंदोत्सवात पाणी पूजन

निळवंडे चे पाणी दुष्काळी भागात येणे हा आनंदाचा क्षण – आ.थोरात

तळेगाव दिघे । विनोद जवरे ।

कॅबिनेट मंत्रीपदाची संधी असतानाही फक्त निळवंडे धरण पूर्ण करण्यासाठी पाटबंधारे राज्यमंत्रीपद मागून घेतले. त्यानंतर सातत्याने कामाला गती देऊन धरण व बोगद्यांसह कालव्यांची कामे पूर्ण केली. अगदी कोरोना काळातही कालव्यांची कामे सुरू केली अनेक वर्ष केलेल्या कामातून निळवंडे धरणाचे पाणी दुष्काळी भागातील शेतात आले हा आनंदाचा क्षण असल्याचे प्रतिपादन निळवंडे धरण व कालव्याचे निर्माते जलनायक आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

लोहारे मिरपुर येथे डाव्या कालव्याचे पाणी पूजन करण्यात आले यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते याप्रसंगी व्यासपीठावर, बाबासाहेब ओहोळ, मिलिंद कानवडे ,संपतराव गोडगे, कार्याध्यक्ष सुभाष सांगळे, प्रभाकरराव कांदळकर, प्रल्हाद मुर्तडक, कृती समितीचे उत्तमराव घोरपडे, गंगाधर गमे, विलास गुळवे, विजय राहने, निलेश शेळके, विजय रणमाळे, दूध संघाचे संचालक संजय पोकळे, विनायक काळे, सचिन दिघे, बाबासाहेब कांदळकर, अनिल कांदळकर, राजेंद्र कहांडळ, संदीप कारले ,डॉ संदीप गोरडे, अरुण पोकळे ,उपसरपंच राहुल पोकळे, प्रा बाबा खरात, डॉ संदीप पोकळे, बाबासाहेब पोकळे, सुनील मुर्तडक आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी आमदार थोरात म्हणाले की, चिंचोली गुरव येथे निळवंडे धरणासाठी ऐतिहासिक पाणी परिषद झाली. निळवंडे धरण हे या भागातील दुष्काळी जनतेसाठी आहे. अनेक वर्ष काम केल्यानंतर आज दुष्काळी भागात पाणी आले आहे. हा शेतकऱ्यांच्या व आपल्या जीवनातील आनंदाचा क्षण आहे. पिढ्यान पिढ्यांनी या पाण्याची वाट पाहिली आहे. आता यापुढे कायमच पाणी येणार आहे. पहिले रोटेशन असल्याने ओढाताण झाली. पण यापुढे सर्वांना पाणी मिळणार आहे. कालव्यांच्या वरच्या गावांमध्ये पाणी मिळण्यास काही अडचण आली परंतु त्यावर मार्ग काढल्या जाईल. आगामी काळात वितरिका लवकरात लवकर पूर्ण करून सर्वांना पाणी मिळेल यासाठी काम होणे गरजेचे आहे. अनेक वर्षाचे कष्ट म्हणून पाणी आले .यामध्ये अनेकांनी योगदान दिले. पुनर्वासित शेतकरी, अकोले तालुक्यातील शेतकरी यांचेही मोठे सहकार्य लाभले. कृती समितीने कालव्यांच्या मागणीसाठी मार खाल्ला. अनेक कष्टातून हे मोठे काम उभे राहिले आहे. काम कोणी केले हे जनतेला माहिती आहे. संगमनेर अकोले व्यतिरिक्त कोणीही या धरणग्रस्तांना जमीन दिली नाही. आपण कधीही जनतेमध्ये दुजाभाव करत नाही. पाणी आले पण या कामासाठी ज्यांनी कष्ट केले तो इतिहास विसरून चालणार नाही असेही ते म्हणाले.

तर उत्तमराव घोरपडे म्हणाले की, निळवंडे धरण व कालवे हे फक्त आमदार बाळासाहेब थोरात यांनीच केली असून ज्यांचे निळवंडे कामांमध्ये काही योगदान नाही ते आज श्रेय घेऊ पाहत आहेत. त्यांनीच या कामांना अडकठ्या निर्माण केल्या आणि सत्तेत आल्यामुळे आज तेच श्रेय घेण्यासाठी धडपड करत आहेत.

यावेळी सौ.दिपाली वर्पे, बाबासाहेब जोंधळे, बाळासाहेब धात्रक,उत्तम रणमाळे, किसन रनमाळे,भडांगे सर, आत्माराम जगताप, रामनाथ बोऱ्हाडे, जनसेवक योगेश पोकळे आदींसह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे स्वागत अरुण पोकळे यांनी केले प्रास्ताविक उपसरपंच राहुल महाराज पोकळे यांनी केले तर बाबासाहेब जोंधळे यांनी आभार मानले.

समन्यायीचे सूत्र मान्य नाही

राज्यात पर्जन्य छायेचा येणारा हा आपला मोठा प्रदेश असून हा सातत्याने दुष्काळी भाग आहे. या दुष्काळी भागासाठीच येथील धरणे बांधली गेली असून पाणी सर्वांना मिळाले पाहिजे. हे खरे आहे. मात्र समन्यायी पाणी वाटपाचे जे सूत्र आहे. ते मान्य नसल्याने आपण सातत्याने विरोध केला आहे. समन्यायी पाणी वाटप कायद्याला सर्वप्रथम संगमनेरनेच विरोध केला. त्यावेळी इतर सर्व गप्प होते.  या कायद्याविरोधात संगमनेर तालुका न्यायालयीन लढाई  लढत असल्याचेही आमदार थोरात यांनी सांगितले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!