ब्रेकिंग
स्कूल चले हम:पहिल्या दिवशी बहादरपूर येथे विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत
स्कूल चले हम:पहिल्या दिवशी बहादरपूर येथे विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

कोपरगांव । विनोद जवरे ।
कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बहादरपूर येथे शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी इयत्ता पहिलीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत मोठ्या जल्लोषात केले गेले.फुले व फुग्यांनी सजविलेल्या बैलगाड्यांवरून लेझीम व ढोल ताश्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत अनोख्या पद्धतीने करण्यात आले शाळा व परिसर फुले व रांगोळ्यांनी सुशोभित करण्यात आला होता

.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कोपरगाव पंचायत समितीचे सदस्य बाळासाहेब राहणे,प्रमुख पाहुणे म्हणून तालुका गटशिक्षण अधिकारी शबाना शेख या होत्या. बहादरपूर चे सरपंच गोपीनाथ राहणे,माजी सरपंच कैलासराव राहणे,शालेय व्यवस्थापनाचे अध्यक्ष भाऊसाहेब राहणे,उपाध्यक्ष अरुण पाडेकर,विषयतज्ञ संजय दहिफळे तसेच माता पालक सदस्य व शिक्षक पालक सदस्य या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत इयत्ता पहिलीच्या नवीन प्रवेश घेतलेल्या मुलांना मोफत गणवेश ,मोफत पाठ्यपुस्तके वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला, पहिल्याच दिवशी मुलांना शाळेविषयी आवड निर्माण व्हावी, त्यांची आकलन क्षमता वाढावी यासाठी शाळा पूर्व तयारी मेळावा अंतर्गत शाळेत विविध स्टॉल लावण्यात आले होते, त्यात मनोरंजनाबरोबरच मुलांनी खेळाचा आनंद घेतला.मिकी माउस व डोरेमोन यांची वेशभूषा केलेल्या व्यक्ती मेळाव्याचे प्रमुख आकर्षण ठरले. याप्रसंगी बाबासाहेब लक्ष्मण राहणे यांनी शाळेतील सर्व मुलांना मिष्ठान्न भोजन दिले.

पंचायत समिती गटशिक्षणअधिकारी शबाना शेख यांनी शाळेमध्ये इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतलेल्या मुलांचे स्वागत गुलाब पुष्प देवून केले व त्यांच्या पालकांचेही आभार मानले.त्या आपल्या मनोगतात म्हणाल्या की जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता ही अजूनही पूर्वीपासून टिकून आहे आणि भविष्यातही टिकून राहणार असल्याचेही सांगितले तसेच त्यांनी सर्वच पालकांना आपल्या पाल्याचा प्रवेश हा फक्त आणि फक्त जिल्हा परिषद शाळेतच करावा असे आव्हान देखील केले.शाळेने राबविलेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल त्यांनी सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले व नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत डोंगरे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद आहेर यांनी केले तर आभार प्रदर्शन गणेश पाचोरे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील उपक्रमशील शिक्षक सचिन आढांगळे,मुरलीधर वाकचौरे,रामदास गव्हाणे यांनी विशेष प्रयत्न केले. यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थी,शिक्षणप्रेमी ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.