दिव्यांग विद्यार्थ्यांचे नैपुण्य कौतुकास्पद – सत्यजित तांबे
650 दिव्यांग विद्यार्थ्यांचा सहभाग
दिव्यांग विद्यार्थ्यांचे नैपुण्य कौतुकास्पद – सत्यजित तांबे
संगमनेर । विनोद जवरे ।
दिव्यांग विद्यार्थी हे विशेष विद्यार्थी असून त्यांच्यामधील कला व क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी संग्राम निवासी मूकबधिर व मतिमंद विद्यालयाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय कला व क्रीडा स्पर्धेत जिल्ह्यातील 650 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून या विद्यार्थ्यांमधील नैपुण्य हे कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे युवा नेते सत्यजित तांबे यांनी केले आहे. जिल्हा समाज कार्यालय व संग्राम निवासी मूकबधिर विद्यालय आणि डॉ. देवेंद्र ओहरा निवासी मतिमंद विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दिव्यांग दिनानिमित्त संगमनेर मध्ये संगमनेर महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर अंध मतिमंद मूकबधिर अस्थिव्यंग प्रवर्गाच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा संपन्न झाल्या .यावेळी शहराच्या नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे, युवक नेते सत्यजित तांबे, समाज कल्याण अधिकारी राधाकिसन देवडे ,सहाय्यक लेखाधिकारी गांगुर्डे, चव्हाण ,सहाय्यक सल्लागार दिनकर नाठे, हिरालाल पगडाल, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अरुण गायकवाड, सेक्रेटरी डॉ नामदेव गुंजाळ, सूर्यकांत शिंदे आदी उपस्थित होते.
25 शाळेतील 650 विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये सहभागीत आपले नैपुण्य दाखवून दिले. क्रीडा स्पर्धेत रनिंग, ॲथलेटिक्स, कबड्डी ,खो-खो अशा विविध स्पर्धा पार पडल्या. तर सांस्कृतिक स्पर्धांमधूनही या विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा साकारत देशातील विविधतेतून एकतेचे दर्शन घडविले. या प्रसंगी बोलताना सत्यजित तांबे म्हणाले की, राज्याचे नेते आमदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संग्राम मतिमंद विद्यालयाच्या माध्यमातून या विशेष विद्यार्थ्यांसाठी चांगली सेवा दिली जात आहे. संग्राम हे गुणवत्तेने राज्यभरातील नावाजलेले विद्यालय आहे. यातील विद्यार्थी हे विशेष विद्यार्थी आहेत. त्यांच्यासाठी काम करणे हे खरे ईश्वराचे काम आहे .या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात दाखवलेली नैपुण्य हे अत्यंत कौतुकास्पद आहे.
तर सौ.दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, संग्राम च्या माध्यमातून जिल्हाभरातील दिव्यांग विद्यार्थ्यांना या ठिकाणी कला व क्रीडा मधून आपले कलागुण दाखवण्याची संधी मिळाली आहे. या स्पर्धेतील विद्यार्थी राज्य पातळीवर नक्कीच जिल्ह्याचे नाव मोठे करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यानंतर या सर्व विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले तसेच या विद्यार्थ्यांची संगमनेर शहरातून भव्य रॅली ही संपन्न झाली. या विद्यार्थ्यांच्या यशस्वी क्रीडा स्पर्धा स्पर्धांच्या आयोजनामध्ये मुख्याध्यापक चांगदेव खेमनर, सुनील कवडे आदींसह सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.