अमृतवाहिनी तंत्रनिकेतन मध्ये माजी विद्यार्थी मेळावा संपन्न
अमृतवाहिनी तंत्रनिकेतन मध्ये माजी विद्यार्थी मेळावा संपन्न
संगमनेर । विनोद जवरे ।
मागील 40 वर्ष उच्चतंत्र शिक्षणातून अनेक विद्यार्थ्यांचे जीवन उज्वल करणाऱ्या अमृतवाहिनी तंत्रनिकेतन मध्ये स्नेहबंध 2023 अंतर्गत माजी विद्यार्थी मेळावा संपन्न झाला असून या विद्यार्थी मेळाव्याला विविध क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत असलेले विद्यार्थी उपस्थित होते.
अमृतवाहिनी तंत्रनिकेतन मधील सभागृहात झालेल्या या माजी विद्यार्थी मेळाव्यास संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्राचार्य व व्यवस्थापक प्रा. विवेक धुमाळ , उप प्राचार्य प्रा. जी.बी. काळे,जिल्हा परिषदेचे सदस्य रामहरी कातोरे, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुभाष सांगळे ,संजय शिंदे, नवनाथ जाधव, विशाल वाघ ,समाधान गायकवाड, सोमनाथ सानप, यांसह मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, कॉम्प्युटर, आयटी , सिव्हिल व इलेक्ट्रॉनिक्स यामधील माजी विद्यार्थी सहभागी होते.
यावेळी बोलताना रामहारी कातोरे म्हणाले की, प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपल्या महाविद्यालयाचा मोठा वाटा असतो .इयत्ता दहावी नंतर आम्ही या तंत्रनिकेतन मध्ये प्रवेश घेतल्यानंतर इंजीनियरिंग क्षेत्र हे ग्रामीण भागासाठी नवे होते .मात्र शिक्षकांचे मार्गदर्शन, संस्थेने दिलेल्या सुविधा यातून आमचे जीवन फुलले .माझ्याबरोबर इतर अनेक विद्यार्थी सिविल क्षेत्रात यशस्वीपणे काम करत आहेत. माणूस कितीही मोठा झाला तरी ज्या संस्थेतून आपण शिकलो त्या संस्थेबद्दल आपल्याला कायम अभिमान असतो असेही ते म्हणाले.तर सुभाष सांगळे म्हणाले की, महाराष्ट्रात आणि देशात विविध क्षेत्रात अभियंते देण्याचे काम अमृतवाहिनी तंत्रनिकेतने केले आहे. आमदार बाळासाहेब थोरात ,आ डॉ सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने उपक्रमशील महाविद्यालयात म्हणून या महाविद्यालयाचा देश पातळीवर गौरव झाला आहे.
तर प्राचार्य प्रा धुमाळ म्हणाले की, माजी विद्यार्थी हीच अमृतवाहिनीची मोठी संपत्ती असून या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाशी कायम समन्वय ठेवून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देता येतील यासाठी कार्यरत असावे असे आवाहनही केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौरव गांधी यांनी केले तर कृष्ण देशमुख यांनी आभार मानले.या स्नेहबंध उपक्रमाचे काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते आमदार बाळासाहेब थोरात ,आमदार डॉ. सुधीर तांबे, विश्वस्त सौ शरयू ताई देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्राचार्य प्रा विवेक धुमाळ, प्रा जी.बी. काळे, प्रा गणेश बोराडे आदींनी अभिनंदन केले आहे.