एस.एस.जी.एम.कॉलेजमध्ये भव्य राज्यस्तरीय कै. सौ. सुशिलाबाई शंकरराव काळे ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
एस.एस.जी.एम.कॉलेजमध्ये भव्य राज्यस्तरीय कै. सौ. सुशिलाबाई शंकरराव काळे ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
कोपरगाव । विनोद जवरे ।
येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स,गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव यांच्या वतीने कै. सौ. सुशिलाबाई शंकरराव काळे उर्फ माई यांच्या स्मृती प्रित्यर्थ, भव्य ‘आंतर- महाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे हे २२वे वर्ष असून सोमवार,दिनांक २ जानेवारी २०२३ रोजी उद्घाटन समारंभ संपन्न होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा या वर्षी ऑनलाइन स्वरूपात घेण्यात येत असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश सानप यांनी दिली.
सदर स्पर्धेतील विजेत्यांसाठी भरघोस रकमेची पारितोषिके ठेवण्यात आलेली असून, प्रथम क्रमांकासाठी रु. ९००१,स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र, द्वितीय क्रमांकासाठी रु.७००१, स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र; तृतीय क्रमांकासाठी रु.५००१, स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र याशिवाय तीन उत्तेजनार्थ स्पर्धकांसाठी रुपये १००१ अशा स्वरूपात बक्षिसे दिली जाणार आहेत. स्पर्धकांना आपले विचार मांडण्यासाठी १) एक समर्पणशील त्यागमूर्ती कै. सौ. सुशिलाबाई शंकरराव काळे. २) आधुनिक काळातील शेती व औद्योगिक धोरणे. ३) काळ बदलला तरी पुस्तके राहणारच……!४) स्वातंत्र्याच्या महोत्सवानंतरची आव्हाने. ५) नवीन शैक्षणिक धोरण: स्वरूप आणि आव्हाने. ६) राष्ट्रनिर्माणासाठी युवकांची भूमिका. ७) येथे पैसा बोलू लागलाय आणि मने झालीत मुकी. ८ )स्त्रियांना आरक्षण मिळाले, संरक्षणाचे काय ? ९) आता आम्हाला नकोय यंत्रसंवाद, हवाय हृदयसंवाद. १०)भारतीय कुटुंब व्यवस्था: एक संस्कार केंद्र. ११)कर्मवीर शंकररावजी काळे साहेब: सहकार,कृषी आणि शैक्षणिक क्षेत्रातील आव्हाने स्वीकारणारे एक द्रष्टे भूमिपुत्र. असे विविध विषय देण्यात आलेले आहेत.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी ०१ जानेवारी २०२३ पर्यंत आपली नाव नोंदणी करावयाची असून स्पर्धेसाठीचा आपला व्हिडिओ ९५५२९८१०६५ या व्हाट्सअप व टेलिग्राम नंबर वर पाठवावयाचा आहे. स्पर्धकांनी अधिकच्या माहितीसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.बाबासाहेब शेंडगे यांच्याशी संपर्क साधावा आणि अधिकाधिक संख्येने स्पर्धेत सहभागी व्हावे.स्पर्धेसाठी आपले ०७ मिनिटांचे व्हिडिओ ०२ जानेवारी २०२३ रोजी पाठवावेत असे आवाहन डॉ. बाबासाहेब शेंडगे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रमेश सानप यांनी केले आहे.