पोलीस नाईक लता जाधव यांचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून सन्मान
पोलीस नाईक लता जाधव यांचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून सन्मान
कोपरगांव । विनोद जवरे ।
शिर्डी पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस नाईक लता रावसाहेब जाधव यांनी गुन्हेगारी रोखण्यासाठी व उघडकीस आणण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली चांगले काम करुन पोलीस खात्याचा नावलौकिक वाढवण्यासाठी केलेल्या कार्याबद्दल नुकताच पोलीस अधीक्षक कार्यालय अहमदनगर यांच्यावतीने महिला दिनाच्या निमित्ताने शिर्डी येथे केलेल्या गुन्ह्याची उकल करत उघडकीस आणण्यासाठी केलेल्या कामगिरीबद्दल जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून त्यांचा शाल सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन हा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला, श्रेया ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस गृह विभागाचे उपाधिक्षक कमलाकर जाधव, पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी आदी पोलीस अधिकारी उपस्थित होते. शिर्डी पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महीला पोलीस नाईक लता जाधव या येवला तालुक्यातील नांदेसर येथील रहिवासी असुन अतिशय गरिब कुटुंबात जन्म घेऊन अतिशय खडतर परिस्थितीत शिक्षण घेऊन पोलीस दलात भरती झाल्यानंतर १३ वर्षात विविध गुन्हे उघडकीस आणण्यासाठी मोठा प्रयत्न केलाच परंतु गुन्हेगारी वाढणार नाही यासाठी सलोखा उपक्रम व वेळप्रसंगी कौटुंबिक समुपदेशन करुन अनेक कुटुंब किरकोळ कारणावरून विभक्त होणार नाही यासाठी जनजागृती केली अशा अनेक कौतुकास्पद कार्याची दखल घेऊन हा गौरव करण्यात आला आहे. जाधव यांचा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून झालेल्या गौरवाबद्दल शिर्डी विभागाचे उपविभागीय अधिकारी संजय सातव, पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील आदींनी कौतुक करत शुभेच्छा दिल्या आहे.