डॉ.मनमोहन सिंग आणि लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांची मैत्री सर्वश्रृत होती – ना.राधाकृष्ण विखे पाटील
डॉ.मनमोहन सिंग आणि लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांची मैत्री सर्वश्रृत होती – ना.राधाकृष्ण विखे पाटील
लोणी । प्रतिनिधी ।
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी देशाचे नेतृत्व करताना अर्थव्यवस्थेला महत्व दिले होते. देशासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचे स्मरण हे सदैव राहील. लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्यातील मैत्रीचा दुवा हा फक्त ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या सुधारणेचा होता. प्रवरानगर येथे त्यांनी दिलेली भेट सदैव स्मरणात राहाणारी असल्याची प्रतिक्रीया जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.
आपल्या शोक संदेशात ना.विखे पाटील यांनी म्हटले आहे की, अतिशय सामान्य कुटुंबीयातून आलेल्या डॉ.मनमोहन सिंग यांनी आपल्या बुध्दीमतेने अर्थकारणात स्वत:ची ओळख निर्माण केली. रिझर्व बॅंकेचे गव्हर्नर ते देशाचे पंतप्रधान हा त्यांचा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला.डॉ.मनमोहन सिंग आणि लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांची मैत्री सर्वश्रृत होती. ग्रामीण अर्थव्यवस्था आणि विकास हाच त्यांच्या मैत्रीतील दुवा होता. खासदार साहेबांच्या विनंतीवरून प्रवरानगरला अर्थतज्ञ डॉ.धनंजयराव गाडगीळ यांच्या पुतळ्याचे, टपाल तिकीटाचे अनावरण आणि सभागृहाच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने त्याची राहीलेली उपस्थिती खूप महत्वपूर्ण होती. याची आठवण सदैव स्मरणात राहाणारी असल्याचे ना.विखे पाटील यांनी आवर्जून सांगितली.
महाराष्ट्राने सन २०१० आणि २०११ या वर्षात तृणधान्य उत्पादनात राज्याने केलेल्या विशेष कामगिरी बद्दल पहील्या दहा राज्यात महाराष्ट्राचा समावेश होता. त्यांच्या उपस्थितीत राज्याचा सन्मान झाला होता. डॉ.मनमोहन सिंग यांच्या हस्ते पुरस्कार स्विकारण्याची संधी मला मिळाल्याची आठवण मंत्री विखे पाटील यांनी सांगितली.