बसस्थानकासमोर रॅली, मेळावे फ्लेक्ससाठी परवानगी देऊ नका
नागरिकांसह बसस्थानक गाळेधारक व्यापाऱ्यांची मागणी

बसस्थानकासमोर रॅली, मेळावे फ्लेक्ससाठी परवानगी देऊ नका

बसस्थानकासमोर रॅली, मेळावे फ्लेक्ससाठी परवानगी देऊ नका
नागरिकांसह बसस्थानक गाळेधारक व्यापाऱ्यांची मागणी
संगमनेर । प्रतिनिधी । महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून संगमनेर शहरांमध्ये साकारलेले हायटेक बस स्थानक हे महाराष्ट्रात लक्षवेधी ठरले आहे. अत्याधुनिक व सर्व सुविधा नियुक्त असलेले हे बस स्थानक एअरपोर्ट म्हणून लौकिक पावला असून सध्या फ्लेक्स बाजी, मेळावे, रॅली यामुळे या परिसरामध्ये गोंधळ होत आहे. याचा परिणाम व्यापारावर होत असून तातडीने या परिसरातील फ्लेक्स बाजी थांबून रॅली, मेळावे व मिरवणुकांसाठी या भागांमध्ये परवानगी देऊ नये अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.

संगमनेर बस स्थानक गाडी धारकांचे व्यापारी संकुल सहकारी संस्थेच्या वतीने मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार ,एकनाथ शिंदे ,परिवहन मंत्री, पालकमंत्री, माजी महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात ,आमदार सत्यजित तांबे यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, संगमनेर बस स्थानक हे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असून लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. बस स्थानकातील व्यापारी संकुलातील गाळे हे बीओटी तत्त्वावर असून व्यावसायिकांनी ते घेतले आहेत. मात्र अलीकडच्या काळात दररोज या ठिकाणी विविध कार्यक्रम होत असून अनेक प्रकारची फ्लेक्स लावली जात आहे. त्यामुळे दुकानांचा दर्शनी भाग झाकला जातो .याचबरोबर विनापरवानगी चे डीजे, गर्दी ,आणि विविध फ्लेक्स यामुळे आमच्या रोजीरोटी वर मोठा परिणाम होत आहे. व्यवसाय मंदावला आहे. तरी शासनाच्या आदेशान्वये संगमनेर बस स्थानकासमोरील व्यापारी संकुलातील बीओटी तत्त्वावरील गाळ्यांसमोरील वाहन तळावर कोणत्याही शासकीय, निमशासकीय, शालेय, राजकीय अथवा खाजगी संस्थांच्या कार्यक्रमांना परवानगी देऊ नये . याचबरोबर या परिसरामध्ये विनापरवानगीचे खूप फ्लेक्स लावले जात आहेत. ते तातडीने काढण्यात यावे अशी मागणी ही निवेदनाद्वारे या व्यापारी संकुलन संस्थेने केली आहे. बस स्थानक परिसरामध्ये होणारी फ्लेक्स बाजी आणि विनापरवानगी चे कार्यक्रम याबाबत संगमनेर मधील नागरिकांनीही नाराजी दर्शवली आहे.
तत्कालीन महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांचे दिशादर्शक काम
संगमनेर हायटेक बसस्थानक हे अत्यंत अत्याधुनिक असून काही कार्यकर्त्यांनी फ्लेक्सबाजी केली. यावेळेस 2021 मध्ये तत्कालीन महसूल मंत्री व विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी स्वतः थांबून सर्व स्वतःचे फ्लेक्स काढले होते. तसेच कार्यकर्त्यांना ही सूचना होत्या की या परिसरामध्ये फ्लेक्स लावू नये जेणेकरून बसस्थानक हे सुंदर दिसेल. लोकनेते बाळासाहेब थोरात यांचे हे दिशादर्शक काम आहे. मात्र संगमनेरच्या या समृद्ध राजकीय परंपरांना हरताळ फासला जात असून अनेक जण विनापरवाना मोठमोठाले फिक्स लावत आहेत. या विरुद्ध नागरिकांनी तक्रार केली आहे. तालुक्यातही फ्लेक्स बाजी थांबली पाहिजे अशी तमाम नागरिकांची मागणी असून नाशिक- पुणे हायवेवर घुलेवाडी शिवारात चार महिन्यापूर्वीचे काही राजकीय पक्षांचे फ्लेक्स ही अजून तसेच लोंबकळत आहे. त्याकडे संबंधित विभागाचे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. त्यावर कोणतीही कार्यवाही होत नसल्याने नागरिकांमध्ये मोठी नाराजी आहे.