कोपरगाव तालुक्यातील नऊ चारी परिसरात जबरी दरोडा


कोपरगाव । विनोद जवरे ।
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर हद्दीतील नऊ चारी येथील रहिवाशी अनिल हरिभाऊ सोनवणे यांच्या राहत्या घरी बुधवार दि १४ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास जबरी दरोडा पडल्याने परिसरात खळबळ उडाली असून सर्वत्र घबराटीचे वातावरण झाले आहे. सविस्तर वृत्त असे की, संवत्सर गावच्या हद्दीतील नऊ चारी परिसरात राहणारे अनिल हरिभाऊ सोनवणे यांच्या घरी बुधवार दि १४ सप्टेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ६ ते ७ अज्ञात इसमानी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश करत विरोध करणारे घर मालक अनिल सोनवणे यांचा पोटावर चाकूने व डोक्यावर गजाने वार करत त्यांची पत्नी व मुलगा यांना धाक दाखवत कोपऱ्यात बसून ठेवत घरातील सर्व ऐवज लुटला. तसेच अनिल सोनवणे यांचा भिंतीला भिंत असणाऱ्या घरात प्रवेश करत तिथे राहणारी अनिल सोनवणे यांची आई सुगंधाबाई व भावजई सुनीता या महिलांना जबर मारहाण करत घरातील व त्यांचा अंगावरील लाखो रुपयांचा ऐवज लुटत घराच्या दरवाजांना बाहेरून कड्या लावत पोबारा केला असून यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.या झटापटीत घरमालक अनिल सोनवणे त्यांची आई सुंगधाबाई व भावजई सुनीता या जखमीना रात्रीच उपचारासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी श्री साई बाबा सुपर स्पेशालिस्ट या हॉस्पिटलमध्ये उपचार करत घरी सोडण्यात आले. या घटनेचे गांभिर्य ओळखत जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, विभागीय पोलिस अधीक्षक संजय सातव, गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. सदर घटनेचा पुढील तपास कोपरगाव शहर पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे हे करत आहे.