ब्रेकिंग

दहशतीचा बंदोबस्त करणार, गणेश चालवण्यासाठी पाठीशी उभा राहणार – आ. बाळासाहेब थोरात

दहशतीचा बंदोबस्त करणार, गणेश चालवण्यासाठी पाठीशी उभा राहणार – आ. बाळासाहेब थोरात

राहाता । विनोद जवरे ।

‘ते आमच्याकडे चालू असलेली कामे बंद करण्यासाठी येतात, मी मात्र येथे बंद असलेल्या संस्था सुरू करण्यासाठी आलो आहे. गणेश सहकारी साखर कारखाना सभासदांच्यात मालकीचा राहिला पाहिजे, त्यासाठी मी भक्कमपणे पाठीशी उभा राहील, या तालुक्यात असलेल्या दहशतीचा टप्प्याटप्प्याने बंदोबस्त करू, इथल्या संस्था चांगल्या विचारांनी चालवू असे स्पष्ट मत आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.

शिवपार्वती लॉन्स साकुरी येथे राहता तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आढावा बैठकीत थोरात बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते डॉ. एकनाथ गोंदकर, बाबासाहेब कोते, जनार्धन घोगरे, सचिन कोते, सुहास वहाडणे, सुधीर म्हस्के, एड. पंकज लोंढे, लताताई डांगे, शितल लहारे, महेंद्र शेळके, विक्रांत दंडवते, मुरलीधर थोरात आदींसह पदाधिकारी आणि शेतकरी परिवर्तन मंडळाचे उमेदवार बहुसंख्येने उपस्थित होते. थोरात म्हणाले, कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक आपण शेतकऱ्यांच्या हितासाठी लढतो आहोत, या तालुक्याला दहशतमुक्त करण्यासाठी हा संघर्ष आपण सुरू केलेला आहे. येथे विकासाला ग्रहण लागले आहे, प्रवरेची स्थिती वाईट झाल्याने, शेतकरी उस लागवड करायला तयार नाही, कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नाही. बाभळेश्वरला ओव्हरब्रीज आहे, धड तो पूर्ण होत नाही किंवा ते अर्धवट बांधकाम काढले जात नाही. सर्वसामान्यांचा जीव धोक्यात आला आहे. मुळात हे सर्व करण्यासाठी इच्छाशक्ती लागते, या तालुक्यातील खंडकरी शेतकऱ्यांचा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित होता, माझ्या समोर हा प्रश्न आला, मी एका निर्णयात २५ हजार एकर जमीनेचे वाटप केले, त्याला नेमका कोणाचा अडथळा होता? हा आहे दोन महसुलमंत्र्यांमधला फरक. हे इकडे वाळूतस्करीवर बोलतात, तिकडे संगमनेर मध्ये मात्र वाळूतस्कर त्यांचे उमेदवार होते.

थोरात म्हणाले, सुरुवातीला विरोधक पॅनलही करू शकणार नाही असे म्हणणाऱ्यांना जनतेनेच उत्तर द्यायचे ठरवलेले आहे. ही निवडणूक राहता तालुक्यातल्या सुजाण पदाधिकाऱ्यांनी हातात घेतलेली आहे. मतदारांचा ज्या पद्धतीने उस्फूर्त प्रतिसाद उमेदवारांना मिळतो आहे, त्यावरून राहता तालुक्यात परिवर्तन अटळ आहे. आपण एकत्र राहिलो, चांगले लढलो, त्यामुळे त्यांना गावोगाव फिरावे लागले. आपण परिवर्तन केले तर ते नीट वागायला लागतील. त्यानंतर सर्वच गोष्टी तुम्हाला बदललेल्या दिसतील. निवडणुकीच्या निमित्ताने अनेक चांगल्या गोष्टी घडत असतात, राहत्याच्या शेतीबरोबरच इथली व्यापार पेठ सुद्धा संपुष्टात आलेली आहे. प्रवरा कारखाना, गणेश कारखाना, राहुरी कारखाना यांच्या नेतृत्वाखाली चालले त्याची अवस्था काय झाली आहे? याचे आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. गणेश सहकारी साखर कारखान्यासारखा अत्यंत चांगला सहकारी साखर कारखाना यांनी चालवायला घेतला. दिल्ली मुंबईत हे मोठी शेकी मिळवायचे की आम्ही तीन-तीन साखर कारखाने चालवतो, मात्र यांची मॅनेजमेंट कारखाना चालवण्यासाठी नाही तर बंद पाडण्यासाठी प्रसिद्ध झाली आहे. एक साखर कारखाना हा आजूबाजूच्या परिसरामध्ये सुख-समृद्धी निर्माण करत असतो. बाजारपेठ फुलते. संगमनेर कारखान्याच्या माध्यमातून सभासद आणि कामगारांच्या जीवनात आनंद निर्माण झाला बाजारपेठेला गती मिळाली. त्यांनी मात्र गणेश कारखाना चालवायला घेतल्यानंतर तो बंद कसा होईल याचीच काळजी घेतली. राहुरी कारखान्यावरून बसने कामगार गणेश मध्ये आणून कारखाना चालवता येत असतो का? कारखाना चालविण्याची पद्धत असते, स्थानिकांचा सहभाग लागतो, यांनी अनेक कामगारांना घरी बसवले, उसाचे गाळप होऊ शकले नाही. या गणेश परिसराचा दुष्काळ संपवण्यासाठी परिवर्तन गरजेचे आहे. त्यासाठी मी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा आहे. याशिवाय गणेश सक्षमपणे चालविण्यासाठी काही कायदेशीर लढाया लढाव्या लागतील, मात्र गेली तीन वर्षे कारखान्याने अहवालच छापलेला नाही, याचा अर्थ यांचे काय चाललाय ते सभासदांना कळू द्यायचे नाही. थोरात पुढे म्हणाले, परिवर्तनाची सुप्त लाट राहाता तालुक्यात निर्माण झालेली आहे. मतदारांनी परिवर्तन करण्याची भूमिका मनोमन स्वीकारलेली आहे. ही दहशत विरुद्ध सन्मानाची लढाई आहे आणि त्यामुळेच या लढाईला सर्वसामान्यांचे आशीर्वाद मिळत आहेत.

मंत्री महोदय संगमनेरला येतात तेच चालू असलेली काम बंद करण्यासाठी, मात्र मी इथे आलो आहे ते बंद असलेल्या संस्था चालू करण्यासाठी, विकासाला गती देण्यासाठी. संगमनेर मध्ये त्यांनी दडपशाही करण्याचा प्रयत्न केला आहे, सत्तेचा दुरुपयोग चालवला आहे मात्र त्याचा सामना करण्यासाठी मी समर्थ आहे. आपल्याला आता एकत्र मिळून राहता तालुक्यात सुरू असलेल्या दहशतीचा कायमचा बंदोबस्त करावा लागेल.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!