अकोले तालुक्याचे आधारवड- स्वर्गीय मधुकरराव पिचड
पाण्यासाठी झटणारा आणि लढणारा नेता अशी त्यांची मोठी ओळख
अकोले तालुक्याचे आधारवड- स्वर्गीय मधुकरराव पिचड
सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी वेढलेला अकोले तालुका हा पुरोगामी आणि डाव्या विचारांचा. संघर्ष आणि चळवळीतून तयार झालेले मधुकरराव पिचड हे अकोले तालुक्याने राज्याला दिलेले संघर्षशील नेतृत्व. विविध मंत्रिपदाच्या माध्यमातून आदिवासी समाजाकरता राज्यभर मोठे काम उभे करताना जलसिंचनाच्या माध्यमातून अकोले तालुका सुजलाम सुफलाम करण्याचे श्रेय हे तालुक्याचे आधारवड असलेल्या मधुकरराव पिचड साहेबांना जाते.
अकोले आणि संगमनेर तालुका हे भाऊ भाऊ म्हणून ओळखले जातात. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी या तालुक्यांमध्ये अनेक चळवळी झाल्या आणि त्यामुळे डावी विचारसरणी रुजली . सह्याद्री पर्वतांमध्ये वसलेल्या राजूर गावात मधुकरराव पिचड यांचा जन्म झाला. महाविद्यालयीन जीवना पासूनच त्यांनी संघर्षातून नेतृत्व घडविले. सुरुवातीला अकोले तालुक्याचे सभापती आणि त्यानंतर ते आमदार झाले. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आदिवासी विकास,दुग्धविकास व पशूसंवर्धन, वने व सामाजिक वनीकरण, परिवहन, पुनर्वसन, आदी मंत्रालय सांभाळताना त्यांनी आदिवासी खात्याला मोठी गती दिली. आदिवासी समाजाकरता राज्यभर मोठे काम केले. मंत्रीपदाबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद, विरोधी पक्ष नेता अशी पदेही त्यांनी भूषविली
1985 मध्ये विधानसभा सदस्य म्हणून आम्ही सोबत काम केले. जिल्ह्यामध्ये तीर्थरूप भाऊसाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली मधुकराव पिचड व आम्ही जिल्हा बँक आणि सर्व संस्थांमध्ये एकत्र काम केले. अकोले तालुक्यात धरण असून सुद्धा संगमनेर आणि अकोले तालुका पाण्यापासून वंचित होता. या तालुक्यातील जनतेने पाणी उचलले तर त्यांना पाणी चोर म्हटले जायचे आणि म्हणून सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली मधुकरराव पिचड व मी 1989 मध्ये भंडारदराच्या पाण्यासाठी मोठे आंदोलन केले .आणि या संघर्षातून या दोन्ही तालुक्यांना 30 टक्के हक्काचे पाणी मिळाले. त्यानंतर येथील शेती फुलली.सिंचनाचे अनेक प्रकल्प पिचड साहेबांनी आपले तालुक्यात राबवले यामध्ये प्रामुख्याने मुळा नदीवरील पिंपळगाव खांड तर आढळा नदीवरील सांगवी, पाडोशी ही धरणे होत.उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरणारे निळवंडे धरण अनेक दिवस रखडले होते. मात्र पिचड साहेब आणि मी 1999 नंतर या कामाला गती दिली. आणि आधी पुनर्वसन मग धरण हा आदर्शवत प्रकल्प राज्याला दिला .तेथील जनतेचे संगमनेर आणि अकोले तालुक्यामध्ये पुनर्वसन केले .या कामाच्या उभारणीमध्ये पिचड साहेबांचा मोठा वाटा राहिला. कालव्यांची कामे सुरू होती त्यावेळेस अनेक शेतकऱ्यांना समजावण्याचे काम त्यांनी केले आणि त्या माध्यमातूनच अकोले तालुक्यातून कालवे पूर्ण झाले.पुरोगामी विचारसरणीच्या मधुकरराव पिचड साहेबांनी सर्वांना बरोबर घेऊन तालुक्याचा सर्वांगीण विकास घडवून आणला.अगस्ति सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली. याचबरोबर अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी , आदिवासी उन्नती सेवा मंडळ या शिक्षण संस्थांच्या माध्यमातून अकोले तालुक्यामध्ये शिक्षणाची पाळे मुळे भक्कम केली .आजही सहकाराबरोबर शिक्षण संस्था या अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू आहेत. आणि याचे श्रेय हे मधुकरराव पिचड यांना जाते. हाच समाजकार्याचा वारसा माजी आमदार वैभवराव पिचड यांनीही सुरू ठेवला आहे.प्रत्येकाची पक्ष जरी वेगळे असले तरी पक्षविरहित माणसे पिचड साहेब यांनी जपली. जिल्हा बँकेमध्ये सदैव आम्हाला साथ दिली.ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून त्यांनी सातत्याने काम केले आणि नव्या पिढीने त्यांचा कायम आदर केला.
पाण्यासाठी झटणारा आणि लढणारा नेता अशी त्यांची मोठी ओळख होती. त्यांच्या निधनाने नव्या पिढीला मार्गदर्शन करणारा एक अनुभवी आणि ज्येष्ठ मार्गदर्शक हरपला असून अकोले तालुक्याचा आधारवड ही त्यांची ओळख सदैव नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे. आयुष्यभर सर्वसामान्यांसाठी झटणाऱ्या या लोकनेत्यास विनम्र अभिवादन
-बाळासाहेब थोरात
माजी महसूल मंत्री, महाराष्ट्र राज्य