
शिर्डी (प्रतिनिधी) – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी अहमदनगर जिल्ह्यात प्रथमच येत असून शिर्डी येथे शनिवार दिनांक 16 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10.30 वा. दौलत बाग, नगर मनमाड हायवे, साकुरी येथे त्यांची भव्य जाहीर सभा होणार आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिव प्रियंका गांधी या अहमदनगर जिल्ह्यात प्रथमच येत असून त्या शिर्डी येथे साईबाबा मंदिरात दर्शन घेणार आहेत. त्यानंतर सकाळी 10.30 वा. दौलतबाग, नगर मनमाड हायवे ,साकुरी येथील भव्य मैदानावर त्या शिर्डी मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ प्रभावती ताई घोगरे व अहमदनगर जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेणार आहेत. यावेळी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी मंत्री आमदार प्राजक्त दादा तनपुरे, आमदार शंकरराव गडाख, हेमंत ओगले, संदीप वर्पे, अमित भांगरे यांसह खासदार निलेश लंके, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, मा आमदार डॉ सुधीर तांबे, जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके ,पैलवान रावसाहेब खेवरे, बाळासाहेब गायकवाड, आदींसह अहमदकर जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. या विजय निर्धार सभेसाठी उत्तर अहमदनगर जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने नागरिक व महिला उपस्थित राहणार असल्याने महाविकास आघाडीच्या वतीने दौलत बाग येथील मैदानावर जय्यत तयारी करण्यात येत आहे. तरी या भव्य विजय निर्धार सभेसाठी उत्तर अहमदनगर जिल्ह्यातील सर्व मतदारसंघातील कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक व महिला यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व मित्रपक्ष आणि महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.