ब्रेकिंग

प्रवरातून उभ्या राहिलेल्या समाजसेवेच्या मंदिरांचा जागतिक सुगंध ! – मंत्री प्रकाश आबिटकर

प्रवरातून उभ्या राहिलेल्या समाजसेवेच्या मंदिरांचा जागतिक सुगंध ! – मंत्री प्रकाश आबिटकर

लोणी । प्रतिनिधी । सहकाराची पंढरी म्हणून परिचित असलेल्या प्रवरानगरीत उभ्या राहिलेल्या शैक्षणिक, सहकार आणि सामाजिक सेवांचा सुवर्णमहिमाच देशभर पसरला आहे. स्वर्गीय पद्मश्री विखे पाटील, लोकनेते बाळासाहेब विखे पाटील आणि पुढील पिढ्यांच्या संस्कारांचा सुकुमार सुगंध महाराष्ट्रासह संपूर्ण देशात दरवळत आहे, असे गौरवोद्गार राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी काढले.


प्रवरा इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस, लोणी या अभिमत विद्यापीठाच्या १९ व्या पदवीदान समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमास जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील, विश्वस्त सुवर्णाताई विखे पाटील, विश्वस्त मोनिका सावंत, विश्वस्त ध्रुव विखे पाटील, कुलगुरू डॉ. विष्णू मगरे, रजिस्ट्रार डॉ. अरुण व्यास, विजय वडवाडगी आदी उपस्थित होते.
या प्रसंगी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ‘फिलिप्स स्मार्ट स्पीड एआय एमआरआय स्कॅनिंग’ मशीनचे ग्रामीण आशिया खंडातील पहिले उद्घाटन प्रवराच्या भूमीत संपन्न झाले. यासोबत एमआर इलॅस्टोग्राफी सुविधेचा शुभारंभ झाला. तसेच क्राफ्टन इंडिया कंपनीच्या सिएसआर अंतर्गत अत्याधुनिक सुविधांनी सज्ज कर्करोग चिकित्सा दंत-फिरत्या दवाखान्याची (मोबाईल व्हॅन) देखील मान्यवरांच्या हस्ते सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुलगुरू डॉ. विष्णू मगरे यांनी केले.मंत्री आबिटकर म्हणाले, “एवढ्या मोठ्या कुटुंबातून असूनही राधाकृष्ण विखे पाटील यांची नम्रता, जमिनीशी जोडलेले नातं आणि समाजसेवेची अखंड भावना ही प्रेरणादायी आहे.” वैद्यकीय क्षेत्रात एआय तंत्रज्ञानामुळे वेगाने बदल होत असताना डॉक्टरांवरची जबाबदारी आणखी वाढली असून, नव्या पिढीतील डॉक्टरांनी समाजसेवेची तळमळ जपावी, असे आवाहनही त्यांनी केले.


मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, “प्रवरा ग्रामीण आरोग्य विद्यापीठाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर दिमाखात झळकत असल्याचा अभिमान आहे. कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील यांनी सातत्याने संशोधन व आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने संस्थेला जागतिक स्पर्धेत टिकवून ठेवले आहे.” प्रवरेचे विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात उत्तुंग यश संपादन करत असल्याने बाळासाहेब विखे पाटील यांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. डॉ. राजेंद्र विखे पाटील यांनी विद्यापीठातील उपक्रमांची माहिती दिली. यावेळी ८८० विद्यार्थ्यांना पदवी आणि १३ विद्यार्थ्यांना पीएच.डी. प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दिपीका भालेराव यांनी केले. सुवर्णपदक विजेते विद्यार्थी: डॉ. पर्व लुथरा, डॉ. त्रिशला कुंकुलोळ, डॉ. सुहानी तोष्णीवाल, डॉ. संस्कृति कुंकुलोळ, सायली वदक, सायली पर्वत, सोनाली पर्वत, विशाल शिंदे, शुभम वाबळे, डॉ. पुर्वा कुराळकर, डॉ. साक्षी शिंदे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!