थोरात कारखान्याकडून ऊस पिकासाठी विविध योजना
प्रती रोप एक रुपया या दराने ऊस रोपे देणार
संगमनेर । विनोद जवरे । काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारात मापदंड असलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाने कार्यक्षेत्रात एकरी उत्पादन वाढ करिता, ऊस बेणे, अमृत शक्ती दाणेदार सेंद्रिय खत, पेप्सी लॅटरल यांसह विविध योजना सुरू केल्या असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ यांनी दिली आहे .
या योजनेबाबत अधिक माहिती देताना ओहोळ पुढे म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वांवर थोरात सहकारी साखर कारखान्याची वाटचाल सुरू आहे. मागील वर्षी कारखान्याने 15 लाख 51 हजार मे़ टन उच्चांकी गाळप केले आहे.
यावर्षी कारखाना कार्यक्षेत्रात भरपूर पाऊस झालेला असल्यामुळे कार्यक्षेत्रात पाण्याची उपलब्धता चांगली आहे. संचालक मंडळाने दि. 1 जानेवारी 2023 नंतर सुरु ऊस लागवड व खोडवा निडवा पीक घेणार्या ऊस उत्पादकांसाठी 50 टक्के अनुदानावर अमृत शक्ती दाणेदार सेंद्रिय खत तसेच दि. 1 जानेवारी 2023 पासून पुढे सुरु ऊस लागवडीसाठी 10,000 बेणे रक्कम वसुलीच्या अटीवर देण्याचा निर्णय घेतला आहे.
याचबरोबर सन 2023-2024ऊस गळित हंगामासाठी दि. 19 फेबु्रवारी 2023 पासून सुरू ऊस लागवडी करतील त्यांना 1 रुपये प्रति रोपाने ऊस रोप देण्यात येणार आहे. तसेच 2023-24 करिता नोंद केलेल्या अशा शेतकर्यांना प्रती हेक्टरी 4000 मिटर पर्यंत पेप्सी लॅटरल मागणी केल्यास वसुलीच्या अटीवर उधारीने पेप्सी लॅटरल देण्यात येणार आहे याबाबत अधिक माहितीकरता कारखाना शेती ऑफिस किंवा गट ऑफिस येथे संपर्क साधावा तसेच या योजनेचा जास्तीत जास्त ऊस उत्पादकांनी लाभ घ्यावा असे आवहन व्हाईस चेअरमन संतोष हासे सर्व संचालक मंडळ व कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले आहे.