गौतम पब्लिक स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात संपन्न ; विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण प्रयोगांनी वेधले सर्वांचे लक्ष


गौतम पब्लिक स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात संपन्न ; विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण प्रयोगांनी वेधले सर्वांचे लक्ष

कोपरगांव । प्रतिनिधी । विज्ञानाची कास धरून भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी सज्ज होण्याच्या उद्देशाने कर्मवीर शंकररावजी काळे साहेब एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित गौतम पब्लिक स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या विज्ञान प्रदर्शनातून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचा संशोधन वृत्तीचा आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा उत्कृष्ट प्रत्यय आला.

कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेचे प्राचार्य नूर शेख यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी भारतरत्न डॉ. सी. व्ही. रमण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी माध्यमिक विभागाच्या पर्यवेक्षिका ज्योती शेलार, प्राथमिक विभागाचे पर्यवेक्षक राजेंद्र आढाव आणि शाळेतील सर्व विज्ञान विषय शिक्षक प्रामुख्याने उपस्थित होते. उद्घाटन सोहळ्यानंतर मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कार्यान्वित प्रकल्पांची बारकाईने पाहणी केली. या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनातील समस्यांवर आधारित वैज्ञानिक उपाय शोधण्याचा प्रयत्न केला. इयत्ता पाचवी ते सातवीच्या लहान गटात साद नसिर पठाण याने तयार केलेल्या फ्री हायब्रीड इलेक्ट्रिक सर्कुलेशन जनरेटर या प्रकल्पाने प्रथम क्रमांक पटकावला. तर क्षीरसागर जय व गायकवाड सार्थक यांनी सेफ्टी ऑफ फार्मिंग अँड शेड या प्रयोगातून शेतीच्या सुरक्षेचा प्रश्न मांडत द्वितीय क्रमांक मिळवला. तृतीय क्रमांक वाघमारे जानवी व रायते गौरी यांच्या प्रयोगाला देण्यात आला.मोठ्या गटात (इयत्ता ८ वी ते ९ वी) कवडे आदेश व गारे प्रत्युष यांनी सादर केलेल्या फ्लड इंडिकेटर (पूर सूचक यंत्र) या प्रकल्पाने सर्वांचे लक्ष वेधून घेत प्रथम क्रमांक मिळवला. कचरा व्यवस्थापनावर आधारित गार्बेज कलेक्शन मशीन तयार करणारे पार्थ फोलाने,मनीष आवारे व खर्डे संचित या तिघांनी द्वितीय क्रमांक पटकावला तर फायर प्रोटेक्शन हाऊस सादर करणाऱ्या पवार विराज व महाले मानव यांना तृतीय क्रमांकाने सन्मानित करण्यात आले.

यावेळी कुमार कवडे कुणाल याने विज्ञान दिनाचे महत्त्व विशद करताना विद्यार्थ्यांनी केवळ परीक्षार्थी न राहता वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासून समाजोपयोगी संशोधन करण्याचे आवाहन केले. विजेत्या व सहभागी सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके आणि प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी भारती उंडे यांनी केले व प्रतिभा बोरनार यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.



