ब्रेकिंग
कोपरगांव तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ
रात्रीच्या वेळी बिबट्या थेट घराच्या दारासमोर ; बिबट्या कॅमेऱ्यात कैद
कोपरगांव तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ

रात्रीच्या वेळी बिबट्या थेट घराच्या दारासमोर ; बिबट्या कॅमेऱ्यात कैद
कोपरगांव । प्रतिनिधी । कोपरगाव तालुक्यातील वेळापुर आणि सूरेगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा अक्षरशः धुमाकुळ सुरू असून नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून बिबट्या थेट घरांच्या दारासमोर दिसतोय, आणि त्याचे हालचालींचे अनेक व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाले आहेत. या काळात बिबट्याने अनेक शेळ्या, बोकड, कारवड आणि कुत्र्यांचा बळी घेतला आहे.

रात्रीच्या वेळी बिबट्याच्या हालचालींमुळे शेतकरी शेतीला पाणी देण्यासाठी शेतात जाणं टाळत आहेत. तर दिवसा देखील महिला व मुलींना शेतात जाण्याची भीती वाटत असून संपूर्ण परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे या वाढत्या धोक्यामुळे स्थानिक नागरिकांनी प्रशासन आणि वनविभागाला तातडीने उपाययोजना करण्याचं आवाहन केलं आहे. “बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावा, अन्यथा आम्हाला स्वतःच्या सुरक्षेसाठी बंदुकी बाळगण्याची परवानगी द्या,” अशी मागणी संतप्त नागरिकांकडून करण्यात आली आहे.दरम्यान, वनविभागाच्या निष्क्रियतेबद्दल नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अनेक वेळा पंचनामे करूनही कोणतीही ठोस कारवाई न केल्याचा आरोप नागरिकांनी वन अधिकाऱ्यांवर केला आहे.स्थानिकांचा रोष दिवसेंदिवस वाढत असून, प्रशासनाने तातडीने प्रभावी पावले उचलावीत, अशी सर्वसामान्यांची मागणी आहे.



