ब्रेकिंग

संगमनेरला सर्वोत्कृष्ट शहराचे आदर्श मॉडेल बनविणार – आ.सत्यजीत तांबे

विकासकामांसाठी निधी आणण्यात आमची पीएचडी

संगमनेरला सर्वोत्कृष्ट शहराचे आदर्श मॉडेल बनविणार – आ.सत्यजीत तांबे


विकासकामांसाठी निधी आणण्यात आमची पीएचडी

संगमनेर । प्रतिनिधी । गेल्या ४० वर्षांत संगमनेर शहरात अनेक विकासकामे पाहायला मिळाली आहेत. हा विकास एका दिवसांचा नसून त्यास मोठा इतिहास आहे. सर्वांच्या मेहनतीनेच शांत, सुशिक्षित आणि सुसंकृत संगमनेर साकारण्यात यश आले आहे. यापुढेही ही वाटचाल अशीच सुरु राहणार असून संगमनेर शहर राज्यातील सर्वोत्कृष्ट शहरांचे आदर्श मॉडेल बनविणार असून जाहीरनामा राबवण्याचा आपला शब्द आहे. विकास कामांसाठी निधी आणण्यात आमची पीएचडी झाली  असल्याचे आमदार सत्यजीत तांबे यांनी सांगितले.

संगमनेर शहरातील नाशिक पुणे रोड येथे आयोजित जाहीर सभेस ते संबोधित करत होते. याप्रसंगी लोकनेते मा.मंत्री बाळासाहेब थोरात, मा.आमदार डॉ.सुधीर तांबे, मा. नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, डॉ.जयश्रीताई थोरात, रणजितसिंह देशमुख, दिलीपराव पुंड,विश्वासराव मुर्तडक, इसाक खान पठाण, सोमेश्वर दिवटे  तसेच सर्व प्रभागातील उमेदवार यांच्यासह  मोठ्या संख्येने संगमनेरवर प्रेम करणारे नागरीक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर विकासातून वैभवशाली ठरले आहे. विकासाची ही परंपरा कायम ठेवण्याबरोबर मागील एक वर्षापासून संगमनेर अशांत करणाऱ्या प्रवृत्तींना रोखण्यासाठी संगमनेर मधील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन राजकारण विरहित संगमनेर सेवा समिती स्थापन केली आहे. या अंतर्गत नगर परिषदेसाठी 20 नवीन चेहरे व 11 अनुभवी उमेदवारांना संधी दिल्याचे त्यांनी सांगितले.विकास हा केवळ योजना राबविल्याने होत नाही तर त्यासाठी जनतेचा पाठींबा लागतो आणि राजकीय इच्छाशक्तीदेखील तितकीच महत्वाची असते. संगमनेर २.० अंतर्गत या सर्व गोष्टी आपण शक्य करणार असलायचे ते म्हणाले. हा जाहीरनामा का? तयार करण्यात आला? त्यात काय आहे? आणि या जाहीरनाम्यात दिलेले वचन आपण पुढे कसे पाळणार आहोत याबाबत सविस्तर नागरिकांना सांगितले. यात प्रामुख्याने, नाशिक पुणे रेल्वे ही संगमनेरमार्गे सुरु करण्यासाठी जनआंदोलन उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील उद्याने, क्रीडा संकुल आणि रस्त्यांचे मजबुतीकरणदेखील केले जाईल. महिला सुरक्षेसाठी कम्युनिटी पोलिसिंग, कमांडो पेट्रोलिंग, ई-टॉईलेट्स, नशामुक्त व गुन्हेगारीमुक्त शहर करून आपले सुसंस्कृत संगमनेर पुन्हा एकदा आपण आणणार आहोत.नगरपालिकेच्या शाळा अद्ययावत करणार आहोत. तसेच हेल्थ क्लब, मल्टीलेव्हल पार्किंग आपण शहरात आणणार असून याद्वारे रस्त्यावरील कोंडी कमी होईल. परिणामी, रस्ते मोकळे श्वास घेतील. शहराचे झालेले विद्रुपीकरण आपण थांबणार असून अनधिकृत फ्लेक्स आणि बोर्ड्सवर बंदी घालणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतचे संगमनेर नगरपरिषदेचे कामे आणखी जलद गतीने व्हावीत, कामात पारदर्शकता येण्यासाठी सुधारणा केल्या जातील. तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर केला जाणार आहे.

ई – संगमनेर  ॲप लांच करून नागरिकांच्या तक्रारी याठिकाणी नोंदवल्या जातील. तसेच विविध दाखलेदेखील याठिकाणी ऑनलाईन उपलब्ध करून देत लहान सहान कामांसाठी नगरपरिषदेच्या कार्यालयातील फेऱ्या आपण कमी करणार असल्याचे ते म्हणाले. यासोबतच शहर धूळमुक्त करण्यासाठी अद्ययावत रोड स्वीपिंग मशीन आता फिरताना दिसतील. हॉकर्स झोन, पत्रकार भवन, दिव्यांग भवन व हस्तकला भवनाची निर्मिती केली जाणार असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले.संगमनेरकरांनी पाठवलेल्या सूचनांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेले संगमनेर २.० नेमके काय असेल याबाबत शहरातील नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. त्यामुळे प्रचंड मोठा जनसमुदाय आजच्या संगमनेर सेवा समितीच्या जाहीर सभेसाठी आलेला होता. जाहीरनाम्यासाठी ११ हजार २५७ नागरिकांनी प्रत्यक्ष सूचना व कल्पना दिल्या होत्या.  हा जाहीरनामा पुढील पाच वर्षांसाठी संगमनेरच्या विकासाचा सर्वांगीण, लोकसहभागातून साकारलेला नियोजनबद्ध रोडमॅप असल्याचे आमदार तांबे यांनी याप्रसंगी सांगितले.लोकनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, ही निवडणूक संगमनेर शहर आणि तालुक्याच्या विकासाची दिशा ठरवणारी आहे. आपसातील सर्व मतभेद विसरून संगमनेर शहरासाठी आणि तालुक्याच्या सुसंस्कृत राजकीय संस्कृतीसाठी सर्वांनी सेवा समितीच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन त्यांनी केले.

 

प्रोजेक्ट प्रवरा नदीची चर्चा

प्रवरा, म्हाळुंगी, म्हानुटी व नाटकी या चार नद्यांच्या संगमावर वसलेल्या संगमनेरमध्ये नदीसुधार प्रकल्प प्रभावीपणे राबविला जाईल. या अंतर्गत निसर्गरम्य वॉकवे आणि जॉगिंग ट्रक, ओपन जिम आणि योगा डेक, सुसज्य गणेश विसर्जन घाट, धोबीघाट, मुक्तीधाम, मुक्तसंवाद गृह आणि संगमनेर चौपाटीसारखे अनेक सुखसोयी यात असणार आहेत. या सर्व विकास कामांसाठी निधी कुठेही कमी पडणार नाही कारण निधी आणण्यात आमची पीएचडी झाली आहे.

     युवकांसाठी युनोव्हेशन सेन्टर्स उभारणार

युवकांसाठी युनोव्हेशन सेन्टर्स उभारले जाणार आहेत. याठिकाणी फोर ई संकल्पनेअंतर्गत शिक्षण, उद्योजकता विकास, रोजगार आणि जीवनावश्यक कौशल्ये या चार वेगवेगळ्या भागात काम केले जाणार आहे. यामध्ये करीयर मार्गदर्शन, शिष्यवृत्ती, अनुदान, कौशल्य विकास, उद्योजकता व स्वयंरोजगार, अर्थसहाय्य, को-वर्किंग स्पेस व सुविधा, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, नोकरीच्या संधी, आर्थिक साक्षरता, नागरी व कायदे साक्षरता आरोग्य आणि सदृढता यावर प्रामुख्याने काम केले जाणार आहे.

ट्विन सिटी कोलॅबरेशन वेधणार लक्ष

संगमनेर शहराचे आदर्श मॉडेल उभारण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय स्तरावरील उत्तम शहरांसोबत परस्पर सहकार्याने संस्कृती, पर्यटन, शिक्षण व्यापार क्षेत्रात काम केले जाणार आहे. ट्विन सिटी साकारण्यासाठी अभ्यासदौरे करून विचार विनिमय केला जाईल. रोजगारासाठी बंगळूर आयटी पार्क व मोठ्या बिझनेस हाऊसेससोबत करारदेखील येणाऱ्या काळात केले जातील.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!